किणी येथील झुटींगबाबा यात्रेनिमित्त ग्रामस्थांचा दारुबंदीचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2018

किणी येथील झुटींगबाबा यात्रेनिमित्त ग्रामस्थांचा दारुबंदीचा निर्णय



कोवाड / प्रतिनिधी
किणी (ता. चंदगड) येथे शुक्रवार (ता. २१) रोजी झुटिंग बाबा यात्रा होत आहे. यात्रा काळात गावात दारूबंदीचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक काढून ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती दिली आहे. दारूबंदी बरोबर ग्रामस्थांनी प्लास्टिक वापरावर निर्बंध आणावेत, असे आवाहनही ग्रामपंचायतीनी केले आहे.
ग्राम स्वच्छतेबरोबर घरोघरी प्रत्येकाने सडा रांगोळी घालून आपापल्या घराच्या अवतीभवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. जेवणानंतर पंत्रावळी आपल्या पर्यायी जागेत ठेवून दुसरे दिवशी घंटागाडीत टाकाव्यात, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी जयप्रकाश विद्यालय व मराठी शाळेच्या आवारात रात्री १२ वाजेपर्यंत वाहनांसाठी पार्किंगची सोय केली आहे. पिण्याच्या पाण्याबाबत ग्रामस्थांनी दक्षता घेऊन पाण्याचा मर्यादीत वापर करावा. देवालय परिसरात दुकान लावणाऱ्या व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी काढून आरक्षित जागेत दुकान घालावे, अशा सुचना करून शांततेचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचाही निर्णयही ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाचे समाजातून स्वागत होत आहे.


No comments:

Post a Comment