कोवाड / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला एकरकमी एफआरपीची रक्कम व गत हंगामातील ऊस बीलाची थकीत रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाकडे केली आहे. संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने कारखान्याचे शेती अधिकारी सुधीर पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली.
कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन ४२ दिवसांचा कालावधी झाला तरी अद्याप गाळप झालेल्या ऊसाची बिलं शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. कायद्याने गाळप झालेल्या ऊसाची बिलं एफआरपी नुसार १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना अजूनही बिलांचा पत्ता नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तसेच १० नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे झालेल्या वैठकीत सन २०१७ - १८च्या ।हंगामातील थकीत रक्कम महिन्याभरात देण्याचे मान्य केले होते. ही थकीत रक्कमही देण्याबाबत कारखान्याच्या हालचाली नाहीत. त्यामुळे कारखाना प्रशासनाने चालू हंगामातील एफआरपीची पूर्ण रक्कम व गत हंगामातील थकीत रक्कम तात्काळ अदा न केल्यास कारखान्याच्या विरोधात आंदोलन करु, असा इशारा संघटनेने निवेदनातून दिला आहे. निवेदनावर राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, राजू पाटील, विश्वनाथ पाटील, विलास पाटील, शिवाजी भोगण, दत्तू बेळगांवकर, रविंद्र पाटील, दत्तू बेनके, बी. एस. धुळाज, शिवगोंड पाटील, केदार जाधव यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment