जनता विद्यालय तुर्केवाडीचा नावलौकिक जगभर वाढावा -प्रभाकर खांडेकर - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2018

जनता विद्यालय तुर्केवाडीचा नावलौकिक जगभर वाढावा -प्रभाकर खांडेकर


तुर्केवाडी :- वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना प्रभाकर खांडेकर व इतर मान्यवर.
मजरे कार्वे / प्रतिनिधी
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालय हे परिसरातील आदर्श विद्यालय आहे. येथील विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव देशात अजरामर केले आहे. अनेक विद्यार्थी मोठ-मोठ्या हुद्द्यांवर काम करीत आहेत. असाच जगभर नावलौकिक या विद्यालयाचा वाढवावा. शाळेच्या विद्यार्थ्यांमधून शास्त्रज्ञ तयार व्हावेत असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी व्यक्त केले. तुर्केवाडी येथील जनता विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर. एन. पाटील होते.
     स्वागत संस्थेचे सचिव जी. एन. पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक  पी. एन. यळूरकर यांनी करून विद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. प्रारंभी तुर्केवाडी चे नवनिर्वाचित सरपंच रुद्राप्पा तेली, डॉ. पी. व्ही. पाटील, डॉ. पी. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.  शेतकऱ्यांचा मुलगा सध्या शेती करायला तयार नाही. म्हणून शेतीला ऊर्जितावस्था येत नाही ही वस्तुस्थिती आहे. ``ग्रामिण भागात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. वास्तवतेकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, असे मत डॉ. पी. व्ही. पाटील यांनी व्यक्त केले.`` ग्रामीण भागातील विद्यार्थी भविष्यात देशाचे नाव उज्वल करणार आहेत, असे मत मानवाधिकारचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पेडणेकर यांनी व्यक्त केले. भविष्यात शासकीय सेवेत विद्यार्थी जावेत जिद्द मनात ठेवून काम केल्यास काहीही अशक्य नाही, असे सांगून 232 कॉटचे अद्ययावत रुग्णालय गडहिंग्लज येथे अत्यंत वाजवी दर घेऊन सेवा करीत आहे, त्याचा लाभ या परिसरातील जनतेने घ्यावा असे मत केदारी रेडेकर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच रुद्राप्पा तेली, आर. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
    प्रारंभी शालेय स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास प्रताप उर्फ पिनू पाटील, पोलीस पाटील माधुरी कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश सुतार, राजू बोलकेदेवाप्पा करडे, अशोक ओऊळकर, तलाठी जे. बी. ठोसरे, प्रकाश पवार, शुभांगी नाईक, एस डी जाधव, गोविंद पाटील, शिवसंत संजय मोरे, रवी पाटील, संभाजी कनगुटकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले. आभार गोविंद हलकर्णीकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment