मगरीचे संग्रहित छायाचित्र |
चंदगड / प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीपात्रात `डोणाचे गोंड` परिसरात शेतकऱ्यांना अनेकदा मगरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे या परिसरात शेतीच्या कामानिमित्त वावरणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे. नांदवडे येथील पुंडलिक गावडे व नारायण गावडे यासह अन्य शेतकऱ्यांनी पाण्याबाहेर आलेली मगर पाहिल्याने याची गावात चर्चा सुरु आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्यामध्ये भितीचे वातावरण आहे.
नांदवडे परिसरातील शेतकऱ्यांची ताम्रपर्णी नदीकाठी मोठ्या प्रमाणात शेती आहे. दिवसा व रात्री-अपरात्री हे शेतकरी शेतातील ऊस व अन्य पिकांना पाणी पाजण्यासाठी जातात. या परिसरात मगरीचा वावर असल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये भितीचे वातावरण आहे. ताम्रपर्णीच्या एका बाजुला नांदवडे तर दुसऱ्या बाजुला करंजगाव येथील शेतकऱ्यांची शेती आहे. त्यामुळ दोन्ही गावातील शेतकऱ्यांना याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी जीव मुठीत घेवून या परिसरात वावरत आहे. यापूर्वी शेतात एकटे वावरत असलेले शेतकरी मगरीच्या वावरामुळे सोबतीशिवाय शेताकडे जायला घाबरत आहेत. हत्ती व गव्यानंतर मगरीचा भितीने शेती करावी कि नाही? अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे वनविभागाने याची गंभीर दखल घेवून मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
No comments:
Post a Comment