कोवाड महाविद्यालयाच्या वतीने दुंडगे येथे 8 ते 14 जानेवारीला श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2019

कोवाड महाविद्यालयाच्या वतीने दुंडगे येथे 8 ते 14 जानेवारीला श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन



कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर 8 ते 14 जानेवारी 2019 या कालावधीत दुंडगे (ता. चंदगड) येथे संपन्न होणार आहे. 'स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियान' हे घोषवाक्य घेऊन महाविद्यालयाचे स्वयंसेवक, स्वयंसेविका, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी शिबिरात सहभागी होणार आहेत.
शिबिरात ग्राम स्वच्छता, गटर सफाई,  सार्वजनिक रस्ता दुरुस्ती, समाज प्रबोधन चर्चा, महिला आरोग्य व शिक्षण, सर्वेक्षन, पशु संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. शिबिराचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सर्वोदय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. आमदार संध्यादेवी कुपेकर, तहसीलदार शिवाजीराव शिंदे, पोलीस निरीक्षक शिवप्रसाद यादव, भरत कुंडल, कल्लाप्पा भोगन आदींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. बुधवारी  दि. 9 रोजी सात वाजता डॉ. प्रा. डी. जे. चीघळीकर यांचे `ग्रामविकासात ग्रामस्थांचे योगदान` या विषयावर,  गुरुवारी 10 रोजी डॉ. सचिन पाटील यांचे `मधुमेह व हदयरोग नियंत्रण`, शुक्रवारी 11 रोजी प्रा. डॉ. सविता व्हटकर यांचे `महिला सक्षमीकरण आणि उद्योग व्यवसाय`, शनिवारी 12 रोजी डॉ. प्रतापराव हन्नुरकर यांचे दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन, रविवारी 13 रोजी एस. डी. खुटवड यांचे `सेंद्रिय शेती समस्या आणि उपाय` या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी दि. 14 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता एम. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आर. जी. पाटील (माजी अप्पर कामगार आयुक्त),  ओलम शुगरचे सुधीर पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, विलास पाटील, राजू रेडेकर आदींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शिबिर काळातील व्याख्याने व सर्व कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य आर. एस. निळपणकर, विभाग प्रमुख आर. डी. कांबळे, ए. एस. जांभळे, व्ही. एम. पाटील व ग्रामपंचायत दुंडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment