![]() |
चंदगड : येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने नायब तहसिलदार डी. एम. नांगरे निवेदन स्विकारताना. |
कोवाड / प्रतिनिधी
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात आज चंदगड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांना देण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यभर ११ जानेवारीपासून शिक्षक संघामार्फत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनातील पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुकास्तरावर संघटनेच्यावतीने शासनाला निवेदन देण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसदर्भात गेल्या साडेचार वर्षात संघटनेने अनेकवेळा आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आहे. मान्य केलेल्या मागण्यांचीही पूर्तता करण्यात आली नाही. प्रत्येक वेळी आश्वासनावर शिक्षकांना झुलते ठेवले आहे. विद्यार्थी हितासाठी संघटनेने अनेक वेळा आंदोलनेही मागे घेऊन सहकार्य केले आहे. पण शासनस्तरावर ठोस निर्णय होत नसल्याने शिक्षकांच्यात असंतोष निर्माण होत आहे. शिक्षण मंत्र्यांचेही आदेश शिक्षण विभागातील अधिकारी पाळत नसल्याचे चित्र आहे. स्वयंअर्थसहाय्य तत्त्वार नवीन शाळांना मंजूरी देऊन शिक्षण व्यवस्थेवर घाला घालण्याचा शासनाचा प्रयत्न सुरु आहे. तसेच सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कायम विनाअनुदानावरील मुल्यांकनास पात्र शाळांची यादी जाहीर करुन त्यांना अनुदान मंजूर करणे, सन २०११ - १२पासूनच्या शिक्षकांच्या वाढीव पदाना मंजूरी देणे, नियुक्ती मान्यता मिळाल्यानंतर तातडीने वेतन सुरू करणे, इतर कर्मचान्यांप्रमाणे शिक्षकांनाही १०, २०, ३० वर्षाच्या सेवेनंतर आश्वासित योजना लागू करणे, संचमान्यतेतील त्रुटी दूर करणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करणे यासह अनेक मागण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. उपप्राचार्य एस. डी. सावंत, प्रा. सुखदेव शहापूरकर, बी. डी. मोरे, एच. के. गावडे, शशिकांत खोराटे, डी. एम. तेऊरवाडकर, पी. डी. पाटील, प्रा. एस. एम. माने, प्रा. एम. बी. नाईक यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment