शेणगाव येथे चंदगड तालुक्यातील चार पत्रकारांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2019

शेणगाव येथे चंदगड तालुक्यातील चार पत्रकारांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान

शेणगाव (ता. गारगोटी) येथे स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्य केलेल्यांचा सत्कार कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर. 
चंदगड / प्रतिनिधी
गारगोटी तालुक्यातील शेनगाव येथील स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने चंदगड चंदगड तालुक्यातील चार पत्रकारांना विविध विभागातील पुरस्कार देवून गौरविण्यात आला. यावेळी गारगोटी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्यातील पत्रकार, साप्ताहिक, इलेक्टॉनिक मिडीया, समाजभूषण ग्रंथालय अशा विविध विभागातील व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी करवीरचे पोलिसउपअधिक्षक सुरज गुरव प्रमुख उपस्थित होते. 

तालुका पत्रकार संघातील तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे (प्रतिनिधी  दै. लोकमत) यांना स्वराज्य समाज भूषण पुरस्कार सिनेअभिनेत्री `इश्काची नौका फेम` प्रांजल पालकर यांच्या हस्ते देण्यात आला. 

संपर्क प्रमुख संतेाष सुतार (चंदगड न्युज लाईव्ह प्रतिनीधी) यांची स्वराज्य आदर्श इलेकट्रॉनिक माध्यम पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यांना यशदा पुणे येथील राज्यस्तरीय व्याख्याता राणी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. 

निवृत्ती हारकारे यांची स्वराज्य आदर्श पत्रकार पुरस्कार यशदा पुणे येथील राज्यस्तरीय व्याख्याता राणी पाटील, निर्भया पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरिक्षक स्नेहा पाटील व माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

संतोष सावंत-भोसले (सा. चंदगड टाईम्स, संपादक) यांची स्वराज्य आदर्श साप्ताहीक पुरस्कार निर्भया पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरिक्षक स्नेहा पाटील व माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

त्याचबरोबर तुडये येथील रामलिंग सार्वजनिक वाचनालयाला स्वराज्य आदर्श वाचनालय पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते. वाचनालयाचे संचालक श्री. मोहिते यांना यशदा पुणे येथील राज्यस्तरीय व्याख्याता राणी पाटील, निर्भया पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरिक्षक स्नेहा पाटील व माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
या कार्यक्रमाचे संयोजन स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापक युवराज येडुरे व अध्यक्षा निवेदिता येडुरे यासह टीमने उत्कृष्ठ नियोजन केले होते. संस्थेचे संस्थापक युवराज येडुरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सौ. निवेदिता येडुरे यांनी केले. यशदा पुणेच्या राणी पाटील म्हणाल्या, ``समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतात. त्याच्या पत्रकारीतेच्या कारकीर्दीत त्यांच्या लेखणीवर अनेकजण मोठे होतात. मात्र पत्रकारांचा गौरव हा क्वचितच ठिकाणी होतो. त्यांचा गौरव करण्याचे काम स्वराज्य संस्थेने केल्याने पत्रकारांची जबाबदारी वाढल्याचे त्यांनी सांगितले.`` 
पोलिस उपअधिक्षक सुरज गुरव म्हणाले, ``पत्रकारांचा सन्मान हा समाजासाठी भूषणावह आहे. पत्रकारांचे काम पोलिसांपेक्षाही जिकीरीचे आहे. त्यांना कोणतेही संरक्षण नसते. समाजासाठी धडपडणारे पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक आहे.`` निर्भया पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरिक्षक स्नेहा पाटील म्हणाल्या, ``महिलांनी समाजात निर्भीडपणे वावरावे. भरकटणाऱ्या मुलांना विश्वासात घेवून त्यांना समज द्या. आजूबाजुला घडत असलेल्या घटनांच्यावर लक्ष ठेवा. मुले पालकांचे अनुकरण करत असल्यामुळे पालकांनी आपले वागणे योग्य ठेवा.`` यावेळी सरपंच सुरेश नाईक, सत्कारमूर्ती आनंद चव्हाण, संदिप बोटे, प्रशांत रणवरे यांची भाषणे झाली. विस्तार अधिकारी विनायक मोरे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment