टस्कराच्या हल्यातून शेतकरी बचावला....कलिवडे येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2019

टस्कराच्या हल्यातून शेतकरी बचावला....कलिवडे येथील घटना

कलिवडे (ता. चंदगड) येथे टस्कराच्या हल्यात बचावलेले विठोबा डुरे यांच्या बैलगाडीचे टस्कराने केलेले नुकसान.
ऊस बैलगाडी काजू झोपडीचे टस्कराकडून नुकसान 
चंदगड / प्रतिनिधी
कलिवडे (ता. चंदगड) येथे काल सायंकाळी टस्कर हत्तीने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची ऊस व बैलगाडीचे नुकसान केले आहे. गावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या बाबु विठोबा डुरे यांच्या घरावर टस्कराने हल्ला करत मोठे नुकसान केले आहे. काल सायंकाळी शेतात पाणी पाजवत असताना विठोबा बाबु डुरे यांचा टस्कराने पाठलाग केला. जीव वाचविण्याच्या नादात डुरे यांनी बांधावरुन खाली उडी मारली. बांध दहा फूट खोल असल्यामुळे टस्कराला उडी मारता न आल्याने डुरे यांचा जीव वाचला. अन्यथा टस्कराच्या तावडीत सापडून कलिवडे गावच्या आणखी एका व्यक्तीला जीव गमावावा लागला असता. टस्कर बांधावरुन पुन्हा परत डुरे यांच्या शेतात येवून बैलगाडी मोडून टाकली व झोपडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच या टस्कराने कलिवडे येथील अशोक धाकलु कदम, विठोबा गावडे, नागोजी देसाई, राजाराम देसाई, दत्तु कदम, लक्ष्मण भोगुलकर, तुकाराम पाटील, तुकाराम कदम, जोतिबा कल्याणकर या शेतकऱ्यांच्या ऊस, काजू, चिक्कु, आंबा, फणस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. टस्कराचा वावर सद्या जंगमहट्टी, कलिवडे, किटवडे, आंबेवाडी, शेवाळे, पाटणे,जेलूगडे परिसरात आहे. दिवसभर शेतकरी भितीच्या छायेत जीव मुठीत घेवून शेतात वावरत आहेत. सद्या विद्युत भारनियमन सुरु असल्याने या भागातील शेतकऱ्यांना रात्रीचेही ऊसाला पाणी पाजवण्यासाठी जावे लागत आहे. वीज वितरण कंपनीने या भागातील रात्रीचे भारनियमन रद्द करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 
विठोबा डुरे यांच्या पत्र्याच्या शेडचे नुकसान केले.
                                                      शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी..............
जंगमहट्टी, कलिवडे, किटवडे, आंबेवाडी, शेवाळे, पाटणे, जेलुगडे या परिसरात टस्कर हत्तीचा वावर असून शेतकऱ्यांनी शेताकडे जाताना सावधगिरी बाळगावी. शेताकडे गटागटाने जावे. टस्कराच्या मागावर वनविभागाचे पथक असून टस्कराचा वावर ज्या ठिकाणी आहे. तेथील माहीती वनविभागाला द्यावी असे आवाहन पाटणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश परब यांनी केले आहे. 
                                                       जुन्या घटनेची चर्चा.........
29 जानेवारी 2006 रोजी कलिवडे येथील कै. उमाजी गुरव हे हत्तीच्या हल्यात मृत्यूमुखी पडले होते. आज टस्कराने केलेल्या विठोबा डुरे हे शेतकरी वाचले. मात्र उमाजी गुरव यांच्या हल्याची चर्चा दिवसभर गाडबसवात सूरू होती.


No comments:

Post a Comment