चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडीच्या सुरज देसाईचे प्रो-कबड्डीचे स्वप्न साकार, पहिल्याच. सामान्यात 18 गुण - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2019

चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडीच्या सुरज देसाईचे प्रो-कबड्डीचे स्वप्न साकार, पहिल्याच. सामान्यात 18 गुण


सुरज देसाई, सिध्दार्थ देसाई
अशोक पाटील / कोवाड प्रतिनिधी
सात वर्षाचे प्रो-कबड्डीचे दरवाजे ठोठावत होता. पहिल्या हंगामात जयपूर संघात निवड झाली होती. पण सेनादलाने परवानगी दिली नसल्याने परवानगी हुकली. पाचव्या मोसमात दिल्ली संघात निवड झाली होती. पण सरावाच्या वेळीच दुखापत झाल्याने त्याची ही संधीही हुकली होती. त्यामुळे सातव्या हंगामात तेलगु टायटन्समध्ये निवड होवून बुधवारी प्रत्यक्ष मैदानात उतरल्याने प्रो-कबड्डीचे सुरजचे स्वप्न साकार झाले.
प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमातील तेलगु टायटन्सचा आघाडीचा खेळाडू बाहुबली फेम सिध्दार्थ देसाईचा भाऊ सुरज देसाई याने बुधवारी दबंग दिल्ली संघाबरोबर झालेल्या सामन्यात सुपर ट्रेकलसह १८ गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रो-लीगच्या सहाव्या मोसमात सिध्दार्थ देसाईचा वरचष्मा राहिला तर सातव्या मोसमात पहिल्याच सामन्यात सुरज देसाईने आक्रमक चढाया करुन सामन्याच्या शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली. तेलगू टायटन्सला अखेरच्या क्षणी एका गुणाने पराभव पत्करावा लागला असला तरी सामन्याचा उत्कृष्ट चढाईपटू व सामन्यातील उत्कृष्ट क्षणाचा बहुमान सुरजला मिळाल्याने हुंदळेवाडी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद साजरा केला. गेली सात वर्षे सुरज प्रो - कबड्डी लीग मध्ये खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. प्रत्येक वेळी धडपडणाऱ्या सुरजला केवळ संधी हुलकावणी देत होती . आजच्या खेळाने सुरजचे हे स्वप्न साकार झाले. सुरज हा सेना दलात नोकरीला आहे. प्रो कब्बडी लीगच्या पहिल्या हंगामात सुरजची जयपुर संघात निवड झाली होती. त्यावेळी सुरजला ८ लाखाची बोली लागली होती. पण सेना दलाकडून त्याला परवानगी न मिळाल्याने त्याची ही नामी संधी हुकली. त्यानंतर पाचव्या हंगामात दिल्ली संघात ५२ लाखाला बोली लागली होती. पण सरावाच्या वेळी पायाला दुखापत झाल्याने ती ही त्याची संधी हुकली. त्यामुळे निराश झालेल्या सुरजने आपला लहान भाऊ सिध्दार्थला मार्गदर्शन करुन प्रो कबडीत संधी मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. सहाव्या मोसमात मुंबई इंडियन संघातून खेळताना सिध्दार्थन आपल्या आक्रमक चढाईने सर्वांचे लक्ष वेधले. प्रत्येक सामन्यात सुपर टेनचा सपाटा लावून २२१ गुण मिळवून प्रो कबड्डीत दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे सातव्या मोसमात सिध्दार्थला तेलगु टायटन्सने १ कोटी ४५ लाखाच्या बोलीवर संघात घेतले. सिध्दार्थचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लागलेल्या बोलीत तेलगु टायटन्सने सुरजलाही १० लाख या अाधारभुत किमतीला संघात घेतले होते. पण आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात तेलगू टायटन्सने सुरजला खेळविले नव्हते. मात्र बुधवारी दबंग दिल्ली संघाबरोबर सुरजला खेळण्याची संधी दिल्याने सुरजचे प्रो - कबड्डीतील स्वप्न सत्यात उतरले. १५ चढ़ायातून सुरजने १८ गुण मिळवून संघातील आपले स्थान भक्कम केले. या सामन्यात तेलगु टायटन्सला पराभव पत्करावा लागला असला तरी सुरजच्या खेळाने संघातील इतर खेळाडूंचे मनसुभे मात्र नक्की उंचावले आहेत.
अशोक पाटील, कोवाड




No comments:

Post a Comment