![]() |
किणी-कर्यात भागात भात रोप लावणीत गुंतलेल्या शेतकरी महिला. |
समाधानकारक पावसामुळे कर्यात भागात रोप लावण्याची धांदल सुरू असून चिखलणीसाठी बैल औत व रोप लावण्यासाठी मजुरांचा तुटवडा भासू लागला आहे. चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कालकुंद्री, दुंडगे , कोवाड, कुदनुर, राजगोळी,किणी, कागणी,निटूर आदी पंधरा - विस गावांचा परिसर कर्यात भाग म्हणून ओळखला जातो. येथील भात पिकाला पोषक हवामान,पाऊस, जमीन, समृद्ध पाणी, दर्जेदार बियाणे यामुळे मुबलक प्रमाणात पिकणाऱ्या भात पिकांमुळे हा भाग जिल्ह्यातील भात पिकाचे कोठार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात ऊस पिकाचे क्षेत्र वाढले असले तरी भाताने आपला वट टिकवून ठेवला आहे. भात पिकाखालील मोठ्या क्षेत्रामुळे येथे पारंपरिक पाच पात्याच्या कुरिने पेरणी होते. तथापि पावसाच्या अनियमितपणामुळे सुरुवातीला रखडलेली पेरणी चिखलात रोप लावणीने पूर्ण केली जात आहे. सध्या चिखल करणारी यंत्रे उपलब्ध असली तरी येथील काळ्या व चिकट मातीमुळे चिखलात अडकून यंत्रे कुचकामी ठरत आहेत. यामुळे चिखल करण्यासाठी बैलांच्या औतांचा भाव वधारला आहे .मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी पैरा पद्धती कडे वळला असून एकमेका सहाय्य करू या उक्तीप्रमाणे कामे उरकून घेण्यात मग्न झाला आहे. एकंदरीत सुरुवातीला वरुणराजाचे आगमन रेंगाळले असले तरी सध्या चांगलाच जोर धरल्याने शेतकरी आनंदात आहे . शिवारात धुळवाफ व कुरीची पेरणीही सजली असल्यामुळे कोळपणी व भांगलणी च्या कामांची हातघाई सुरू आहे.
No comments:
Post a Comment