राजगोळी खुर्द येथील दारू विक्रेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी महिलांचे पोलिसांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2019

राजगोळी खुर्द येथील दारू विक्रेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी महिलांचे पोलिसांना निवेदन

कोवाड : राजगोळी खुर्द येथील महिला गावठी दारू विक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांना निवेदन देताना.
कोवाड / प्रतिनिधि
राजगोळी खुर्द ( ता . चंदगड ) येथे अवैध मार्गाने गल्लीतून गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे . पोलिसांच्या कारवाईची भिती नसल्याने दारू विक्रेत्यांची गावात अरेरावी सुरू असून तरुणपिढीला व्यसनाधिनतेकडे वळविणाऱ्या दारु विक्रेत्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी , अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा संतप्त झालेल्या महिलानी कोवाङ पोलिसांना दिला आहे . दारू विक्रीमुळे गोरगरीब कुटुंबं कशी उध्वस्त झाली आहेत आणि दारू विक्रेत्यांनी गावात दहशत कशी निर्माण केली आहे . याबाबत महिलानी पोलिसाना जाब विचारुन आपले गाऱ्हाने मांडले. महिलानी पोलिसांना याबाबत निवेदन देऊन दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली .
निवेदनात म्हटले आहे की , गेल्या अनेक वर्षापासून गावात गावठी दारु विक्री सुरु आहे . पोलिस यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याने त्याना अभय मिळाले आहे . त्यामुळे दारू विक्रेते गावात बिनधास्तपणे दारुची विक्री करत आहेत . उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई का करत नाहीत , असा सवाल महिलानी केला आहे . दारुचा व्यवसाय तेजीत चालावा म्हणून तरुणांच्यासह घरच्या कर्त्या पुरुषाना विक्रेत्यानी दारुच्या नादी लावले आहे . त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत . दारु विक्रेत्यांच्या विरोधात आवाज़ उठविला तर त्यांच्याकडून दमदाटी केली जाते . प्रसंगी अंगावर धावून येतात . दारु विक्रीमुळे गावात भांडणतंटे वाढले आहेत . मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. महिलाना आर्वाच्य शिवीगाळ करणे व धमकी देणेचे प्रकार होत असल्याने पोलिसांनी तात्काळ दारू विक्रेत्यांच्यावर कारवाई करावी , अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा महिलानी निवेदनातून दिला आहे . निवेदनावर पारला गस्ती , लक्ष्मी कुंभार , मंगल नाईक , सुवर्णा नाईक , सुवर्णा सुतकट्टी यांच्यासह महिलांच्या सह्या आहेत . 

दारू विक्रेत्यांच्या विरोधात आवाज उठविणार - याना दारू विक्रेत्यांचा एक फंटर धमकी देत आहे . पोलिस यंत्रणेशी माझे संबंध असून तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडेन अशी धमकी त्याच्याकडून दिली जात असल्याचे महिलानी सांगितले . त्यामुळे पोलिसानी या फंटरचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी महिलानी केली आहे. 


No comments:

Post a Comment