![]() |
मुसळधार पावसामुळे कोनेवाडी (ता. चंदगड) येथील बंधार पाण्याखाली गेल्याने शिवाराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. |
चंदगड / प्रतिनिधी
गेले तीन-चार दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील कोनेवाडी, हल्लारवाडी, करंजगाव हे तीन बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कोनेवाडी बंधारा पाण्याखाली गेल्याने कोनेवाडी, नांदवडे, शिप्पूर व कोळींद्रे ग्रामस्थांना हेरेमार्गे चंदगडला यावे लागत आहे. करंजगाव बंधारा पाण्याखाली गेल्याने ही वाहतुक हेरेमार्गे सुरु आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर मंगळवारी दुपारपर्यंत तालुक्यातील सर्व मार्ग बंद होवू शकतात. कोनेवाडी बंधाऱ्यावर पाणी आल्याने चंदगड-बेळगाव-गुडवळे बससेवा चंदगडमार्गे हेरे-गुडवळे अशी वळविण्यात आली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 97 मिलीमीटर तर आतापर्यंत 756 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तुर्केवाडी येथील वैजु रवळु गावडे यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. काल दिवसभरात हेरे परिसरात ढगफुटी होवून 201 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हेरे गावाशेजारी हेरे – मोटणवाडी रोडवर असलेल्या ओढ्याला पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक संपुर्णत: बंद अवस्थेत आहे. त्याखालोखाल तुर्कवाडी मंडलमध्ये 184 तर सर्वांत कमी माणगाव मंडलमध्ये 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस रोपलावणीच्या कामांना उपयुक्त ठरला आहे. मात्र शिवारात सर्वत्र पाणी-पाणी झाल्याने शेतकऱ्यांना सक्तीची सुट्टी मिळाली आहे.
No comments:
Post a Comment