![]() |
मजरे कारवे -- येथील होनहाळ नाल्याच्या पुरामुळे नुकसान झालेली रोप लागवड. |
निवृत्ती हारकारे / कार्वे प्रतिनिधी
गेल्या तीन-चार दिवसांपासून कार्वे, तुर्केवाडी परिसरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जूनच्या अखेरीस खऱ्या अर्थाने येथे मान्सूनला सुरुवात झाली. एक महिना उशिराने सुरुवात झालेल्या पावसाने दमदार एन्ट्री मारली व अवघ्या दहा दिवसात सरासरी इतका पाऊस झाला. पावसाळ्यापूर्वीच येथील शेतकऱ्यांनी विद्युत पंपाच्या साह्याने रोप लागवडीसाठी भाताचा तरवा तयार केला होता. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच रोप लागवडीला सुरुवात केली होती. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रोप लागवड पूर्णही केली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या तुफान गोष्टीमुळे रोप लागवड मंदावली आहे.
होन हाळ नाल्याला पूर
जंगमहट्टी मध्यम प्रकल्प ज्या नाल्यावर आहे, तो होनहाळ नाला. ह्या नाल्याला आजपर्यंत कधीही जंगमहट्टी धरण भरल्याशिवाय पूर आला नव्हता. यावेळी मात्र जंगमहट्टी धरण पाणलोट क्षेत्रात व तुर्केवाडी, माडवळे परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे या नाल्याला दोन वेळा पूर आला. या दरम्यान तुर्केवाडी मंडळ येथे गेल्या पाच दिवसात जवळपास 650 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद विक्रमी असल्याचे मानले जात आहे. याच पावसाने होणहाळ नाल्याला पूर आला आहे. या नाल्यावरील ढोलगरवाडी ते गौळवाडी ला जोडणाऱ्या बंधाऱ्यावर आठ वर्षानंतर पाणी आले असल्याचे बोलले जात असून येथील वाहतूक दोन दिवस पूर्णपणे बंद होती.
पुराने रोप लागवडीचे नुकसान
होणहाळ नाल्याला अचानक आलेल्या पुरामुळे येथील शेतकरी मात्र भयभीत झाले होते. जुनी-जानती लोक असा पाऊस सध्या तरी कधी झाला नाही. अशा भावना व्यक्त करत होती. या पावसाने आलेल्या पुरात येथील रोप लागवडीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेल्या तरव्याच्या पेंड्या वाहून गेल्या. रोप लागवडीसाठी तयार करण्यात आलेला चिखलच वाहून जाण्याचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी जोरात आलेल्या पाण्यामुळे लावलेल्या रोपाच वाहून गेल्या आहेत. काही ठिकाणी एका शेतातील माती वाहून दुसऱ्या शेतात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना पिकांची पाहणी करून पंचनामा करावा व शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
जंगमहट्टी धरणात 50 टक्के इतका पाणीसाठा
गेले दहा दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने जंगमहट्टी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी लवकरच 50 टक्के इतका पाणीसाठा धरणात झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला जंगमहट्टी धरणात 46 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे या वेळच्या पावसाची तीव्रता किती आहे हे लक्षात येते.
धरणावर सुरक्षिततेची गरज
जंगमहट्टी मध्यम प्रकल्पावर कुठलीही सुरक्षा नाही. याच धरणात पर्यटक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या चंदगड तालुक्यात पर्यटनासाठी असंख्य पर्यटक येत आहेत. पाटणे फाट्यापासून तिलारी पर्यंत असलेला निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे. याच दरम्यान जंगमहट्टी मध्यम प्रकल्प असल्याने येथेही पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चंदगड तालुक्याच्या निम्म्या भागाला वरदान ठरलेल्या या प्रकल्पाला सुरक्षेची गरज आहे. असाच पावसाचा जोर राहिल्यास येत्या आठ-दहा दिवसात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment