![]() |
कानडी (ता. चंदगड) येथील बंधारा सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प आहे. |
चंदगड / प्रतिनिधी
गेले आठ-दहा दिवस सुरु असलेल्या संततधार पावसाचा जोर आज काहीसा ओसरला आहे. मात्र आजही कोनेवाडी, हल्लारवाडी, करंजगाव, कानडी व माणगाव हे बंधारे पाण्याखालीच आहेत. त्याचबरोबर चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड पुल व हिंडगाव-इब्राहिमपूर मार्गावरील पुल सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखालीच आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुरस्थिती जैसे थे आहे.
कालपासून पाण्याखाली असलेला केवळ गवसे बंधाऱ्यावरील वाहतुक सुरु आहे. कोनेवाडी, हल्लारवाडी, करंजगाव हे तीनही बंधारे गेले पाच दिवस पाण्याखालीच आहेत. या बंधाऱ्याजवळील ताम्रपर्णी पात्राजवळील शेतातील पिके गेले पाच दिवस पाण्याखालीच असल्याने हि नदीकाठची पिके कुजण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुरामुळे सर्वत्र पाणीच-पाणी झाल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वत्र उद्या सायंकाळपासून वाहतुक सुरळीत होईल अशी शक्यता आहे. कोनेवाडी, हल्लारवाडी, करंजगाव हे बंधारे गेले पाच दिवस पाण्याखालीच असल्याने यावरुन शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यांनी दरवर्षी उद्भवणाऱ्या आपत्तीकडे गांभीर्याने लक्ष देवून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरीकांतून होत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 57मिमी तर आतापर्यत 994.66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडलनिहाय पाऊस व कंसात आतापर्यंतचा एकुण पाऊस - चंदगड -47 मिमी (1111), नागणवाडी -58मिमी (904), माणगाव -42मिमी (351), कोवाड -36मिमी (359), तुर्केवाडी -75मिमी (1107) व हेरे -84मिमी (1703). तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील मौजे गौळवाडी येथील नारायण वैजू ओऊळकर यांच्या घराची भिंत पडून 25000 रुपयांचे नुकसान, सदर घराच्या बाकीच्या भिंतींना तडे गेल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंब शेजारी स्थलांतर केले आहे. नागरदळे येथील महादेव रामू सुतार यांच्या घराची भिंत कोसळून 30000 रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे चिंचणे पैकी कमलवाडी येथील निळाप्पा यल्लाप्पा पाटील यांच्या घराची भिंत कोसळून 50000 रुपयांचे तर मौजे तुडिये येथील अनंत मोनाप्पा मोहिते यांच्या गोठ्याची भिंत कोसळून 10000 नुकसान झाले आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहता चंदगड व हेरे परिसरात अतिवृष्टी झाल्याचे वरील आकडेवारीवरुन लक्षात येते.
No comments:
Post a Comment