शिक्षकांना अपडेट ठेवण्यासाठी प्रशिक्षणांची गरज - प्राचार्य ए. एस. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2019

शिक्षकांना अपडेट ठेवण्यासाठी प्रशिक्षणांची गरज - प्राचार्य ए. एस. पाटील

कोवाड (ता. चंदगड) येथील समृद्धी पर्व शिक्षक प्रशिक्षण प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित ए. एस. पाटील, वाय. आर. निटूरकर, तज्ञ मार्गदर्शक व मान्यवर.
कोवाड / प्रतिनिधी
शिक्षकांना बदलत्या शिक्षण प्रणालीत अपडेट ठेवण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणे गरजेची आहेत. तथापि त्यांचा केवळ फार्स नको. प्रशिक्षणासाठी योग्य नियोजनासह तज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षणार्थींना मिळणाऱ्या सोयी सुविधांसाठी निधीची उपलब्धता हवी असे प्रतिपादन श्रीराम विद्यालय व श्रीमान व्ही. पी. देसाई ज्युनिअर कॉलेज कोवाडचे प्राचार्य ए. एस. पाटील यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथे संपन्न झालेल्या शिक्षक सक्षमीकरण- समृद्धी पर्व प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
केंद्रप्रमुख वाय. आर. निटूरकर यांनी स्वागत केले. साधन व्यक्ती सागर पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पर्यवेक्षक श्री. मनगुतकर, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, दस्तगीर उस्ताद, सुभाष बेळगावकर, अनंत पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत झालेल्या या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून आनंदा पाटील, सट्टूपा  पाटील, ज. ल. पाटील, सागर पाटील यांनी दोन दिवसीय प्रशिक्षणात १०० टक्के पटनोंदणी शून्य टक्के गळती, अपंग समावेशित शिक्षण, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे शिक्षण, शाळा समृद्धी गुणांकनसह विद्यार्थी व शाळा यांचा सर्वांगीण विकास करून सर्व शाळा `अ` श्रेणीत कशा आणता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. कुदनुर केंद्रप्रमुख डी. आय. पाटील, आर, व्ही. सावंत, शंकर कोरी, टी. जे. पाटील, भैरू भोगण आदींसह  कोवाड बीट अंतर्गत कालकुंद्री, कोवाड, कुदनुर केंद्रातील सर्व प्राथमिक व आठवीपर्यंत शिकवणाऱ्या माध्यमिक शिक्षकांची उपस्थिती होती. विलास पाटील यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.

No comments:

Post a Comment