कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील बीएसएनएल दूरध्वनी केंद्र महापुरात बुडून गेल्या वीस दिवसांपासून सेवा खंडित झाली आहे. तथापि दि. १९ पर्यंत एकही वरिष्ठ अधिकारी इकडे फिरकला नसल्याचे कळते. यामुळे ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोवाड बाजारपेठेला गत आठवड्यात महापुराचा तडाखा बसून कोट्यवधी च्या मालमत्तेचे नुकसान झाले. यात कोवाड दूरध्वनी केंद्र ही वाचले नाही. महापूर ओसरल्यानंतर सर्वत्र नव्या उभारणीची धडपड सुरू असली तरी बीएसएनएल याला अपवाद ठरत आहे. शेकडो घरगुती ग्राहक तसेच येथील स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट कार्यालय, अनेक पतसंस्था यातून बीएसएनएल ब्रॉडबँड सेवा घेतली आहे. मात्र बीएसएनएलच्या बंद सेवेमुळे अतिवृष्टी व महापुरामुळे मेटाकुटीस आलेल्या ग्राहकांना बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचा फटका बसत आहे. महापूर बाधित क्षेत्रातील जनजीवन सुरळीत करण्यासाठी शासनाच्या तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या अनेक यंत्रणा अहोरात्र झटत असताना दूरध्वनी एक्सचेंज मधील जनरेटर सह सर्व यंत्रणा दहा दिवस पाण्याखाली जाऊन गाळाने भरली आहे. त्याचे काय झाले असेल हे पाहण्यासाठी पुर ओसरून आठ दिवस झाले तरी एकही वरिष्ठ अधिकारी फिरकला नाही याबद्दल कोवाड व कुदनुर परिसरात आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment