पुरामुळे होणार उत्पादनात 80 टक्के घट, पुढील वर्षी जगायचे कसे? शेतकऱ्यांसमोर प्रश्न - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2019

पुरामुळे होणार उत्पादनात 80 टक्के घट, पुढील वर्षी जगायचे कसे? शेतकऱ्यांसमोर प्रश्न

पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ऊस वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. 
निवृत्ती हारकारे / कार्वे
श्रावण महीना म्हणजे ऊन-पावसाचा खेळ. गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात श्रावण मासात इतकी कधी आपत्ती आली नव्हती. यावर्षीचा श्रावणमास सुरू झाला तो एक काळ रात्र घेऊनच. याच श्रावण मासाच्या प्रारंभापासून चंदगड तालुक्यात हाहाकार माजला. फाटकवाडी पासून राजगोळी पर्यंत व झांबरे -उमगाव पासून कोलिक- म्हाळुंगे पर्यंत गाव नाही ज्या गावाला पावसाचा तडाखा बसला नाही. प्रमुख बाजारपेठ असलेल्या गावांमधून व्यावसायिकांच्या व्यवसायांची तर अक्षरशः वाट लागली. तरी छोट्या-मोठ्या गावांमधून शेतकरी कुटुंबे अक्षरशः उध्वस्त झाली. क्षणात होत्याचे नव्हते झाले. रात्रं दिवसाच्या कष्टातून उभारलेले संसार डोळ्यासमोर नष्ट झाले. प्रापंचिक साहित्यासह घरे  जमीनदोस्त झाली. पुराच्या पाण्यातून संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. अंगावरच्या कपड्यानिशी लोकांनी घरे सोडली. आयुष्य भराची कमाई डोळ्यासमोरून नष्ट होताना बघितले. हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहण्याखेरीज कुणाच्याही हातात काही नव्हते.
पुरामुळे भुईसपाट झालेले भातपिक
पूर ओसरत गेला तशा नुकसान झालेल्या गोष्टी समोर येऊ लागल्या. उघड्यावर पडलेले संसार पाहताना मनं सुन्न होत होती. पूर ओसरला व मदतकार्य सुरू झाले. अनेक दानशूर पुढे येऊ लागले. अगदी महाराष्ट्रभरातून मदतीसाठी हात पुढे येऊ लागले. मोठ्या गावांमधून  ट्रक च्या ट्रक साहित्य येऊन पडू लागले. मदत इतकी होऊ लागली कि पूरग्रस्तांना साहित्य ठेवायला जागा नाही. मात्र बऱ्याच छोट्या छोट्या गावांमध्ये उघड्यावर पडलेल्या नागरिकांना मदतीसाठी वाट पहावी लागत आहे. तालुक्यातील  काही गावे आजही वंचित आहेत. त्या सगळ्यात मात्र चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.
येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरा ओला दुष्काळ तर पुढेच आहे, असे बोलले जात आहे. यामहापुराच्या तडाख्यात जशी घरे जमीनदोस्त झाली. तशी येथील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. भाताचे उत्पादन 10 ते 20% वर येणार आहे. किंबहुना काही शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. भात, ऊस, नाचणी, भुईमूग, बटाटे, रताळी यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील वर्षी खायला अन्न नाही व उसाचे नुकसान झाल्याने बाजारासाठी पैसे नाहीत. अशी केविलवाणी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. साठवून ठेवलेली वाळकी वैरण  वाहून गेली.  ओली वैरण  वाढ नाही झाली.  अशा परिस्थितीत आहे.  त्यामुळे चंदगड तालुक्यातील दूध व्यवसाय सुद्धा धोक्यात आला आहे.  दुग्ध व्यवसायामुळे घरातील प्रापंचिक खर्च  भागत होता. मात्र या पावसाच्या तडाख्याने  त्या व्यवसायाला सुध्दा दृष्ट लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुढील वर्षी जगायचे तरी कसे हा यक्ष प्रश्न येथील शेतकऱ्यांच्या पुढे उभा आहे. 
शासन स्तरावर नुकसानीबाबत चौकशी केल्यास घरांच्या, व्यावसायिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसान भरपाईचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणार असल्याचे समजते. मात्र तोपर्यंत पुला  खालुन बरेच पाणी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उध्वस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. झालेल्या नुकसानीची किरकोळ भरपाई न देता उत्पादन खर्चाशी निगडित व उत्पादनावर असावी.  चालू सालात येथील शेतकऱ्यांनी घेतलेली पीक कर्जे पूर्णता माफ करावीत अशी अपेक्षा येथील शेतकरी  बाळगून आहेत.

No comments:

Post a Comment