राष्ट्रवादीचे चंदगड तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील यांचा राजीनामा - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2019

राष्ट्रवादीचे चंदगड तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील यांचा राजीनामा

एम. जे. पाटील
कोवाड / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील एम. जे. पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंदगड तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. 
श्री. पाटील हे गेली दहा वर्षे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चंदगड तालुका अध्यक्ष या पदावर काम करत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पक्षाकडे चंदगडची उमेदवारी मागितली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाचा एकमेव इच्छुक उमेदवार म्हणून या मतदारसंघातून एकट्याने मुलाखत दिली होती. मात्र एबी फॉर्म देण्याच्या अगोदरच्या दिवशी त्यांच्यासह कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ज्यांचा पक्षाशी काहीही व कोणताही संबंध नाही अशा उमेदवाराला उमेदवारी दिली असल्याचे त्यांचे म्हणने आहे. अशा गोष्टी एकदा नव्हे तर अनेकदा घडल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्येही त्यांना विश्वासात घेतले नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यावेळीही मनमानेल तसे निर्णय घेतले होते, तसे आजही घडले आहे. म्हणून मी माझ्या प्राथमिक सदस्यत्व आणि कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंदगड तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे श्री. पाटील यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. 

एम. जे. पाटील यांना मानणारा कालकुंद्री परिसरात मोठा गट आहे. त्यांच्या पत्नी सुजाता पाटील या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. राष्ट्रवादीतून राजेश पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. एम. जे. पाटील यांची कालकुंद्री परिसरातील राजकीय वजन पाहता राष्ट्रवादीला त्यांची समजूत काढावी लागणार आहे. अन्यथा राष्ट्रवादीला याचा फटका बसू शकतो. अन्य उमेदवार त्यांच्या नाराजीचा फायदा घेवून त्यांच्या गटाची ताकद मिळविण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

No comments:

Post a Comment