चंदगड तालुका बनला जिल्ह्यातील पहिला तंबाखूमुक्त तालुका - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2019

चंदगड तालुका बनला जिल्ह्यातील पहिला तंबाखूमुक्त तालुका

केंद्र शाळा कोवाड च्या आवारात रॅली काढून तंबाखू पाकिटांची होळी करताना मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव,सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी.
कालकुंद्री / प्रतिनिधी
महाराष्ट्रात सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या तंबाखु मुक्त अभियानामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला तंबाखूमुक्त तालुका होण्याचा मान चंदगड तालुक्याने पटकावला आहे.
तंबाखुच्या व्यसनाचे दुष्परिणाम, त्यामुळे उद्भवणारे कॅन्सर सारखे विविध घातक रोग यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील पिढी या व्यसनापासून मुक्त रहावी या उद्देशाने सलाम मुंबई फाऊंडेशने ही चळवळ सुरू केली आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था तंबाखुमुक्त करण्यासाठी विविध स्तरावर धडपड सुरू आहे. सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी प्राथ. सौ. अशा उबाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार आदी अधिकाऱ्यांनी याकामी मोहीमच उघडली होती. 
चंदगड तालुक्यात तंबाखुमुक्त अभियानचे समन्वयक म्हणून वाय. के. चौधरी (केंद्रप्रमुख हलकर्णी), शशिकांत सुतार (अध्यापक सुरूते), दशरथ सुर्यवंशी (अध्यापक विमं सुपे), गजानन बैनवाडकर (अध्यापक केंद्रशाळा इब्राहिमपूर) यांनी  याकामी अथक परिश्रम घेतले. तालुक्यातील १९ केंद्रात  प्रत्येकी एक तंत्रस्नेही शिक्षक  नेमला. सर्व प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापकांच्या विभागवार कार्यशाळा घेऊन तंबाखू मुक्त चे ११ निकष पूर्ण करून घेण्यासाठी मार्गदर्शन व पाठपुरावा केला. त्याला आज यश आले. या सर्वांना जिल्हा समन्वयक संजय ठाणगे, रवी कांबळे, बसवराज कुंभार, चंदगडच्या गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार, गटविकास अधिकारी  रमेश जोशी  आदींचे मार्गदर्शन लाभले. 

चंदगड तालुका तंबाखूमुक्त घोषित झाल्यामुळे यापुढे चंदगड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांसह सर्व शिक्षण संस्थांच्या आवारात तंबाखु किंवा सिगरेट, बिडी, गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे, शाळांच्या 100 मीटर आवारात विक्री करणे हा दंडनीय गुन्हा ठरणार आहे. सर्वांनी याची नोंद घेऊन शिक्षण संकुलांचे पावित्र टिकवावे असे आवाहन तालुका व जिल्हा प्रशासनामार्फत केले आहे. 

No comments:

Post a Comment