चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा ते पारगड रस्त्याच्या निकृष्ट पॅचवर्कविरोधात कोल्हापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच चंदगड तालूक्यातील युवकांनी जोरदार आंदोलन करण्यात आले. महिनाभरापूर्वी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच रस्ता उकरुन पोलखोल करण्यात आली होती. त्यानंतर या रस्त्याचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले. मात्र, अद्याप ही पाहणी झाली नसल्याने अखेर पुन्हा आज (शुक्रवारी) बांधकाम विभागासमोर 'भीक मागो' आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांना धारेवर धरले. तसेच गव्हर्नमेंन्ट पॉलिटेक्निक किंवा शिवाजी विद्यापीठाच्या डिओटी विभागाकडून रस्त्याची त्रयस्त पाहणी त्वरीत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांना देण्यात आले. यावेळी अनिल तळगुळकर, विश्वनाथ ओऊळकर, गारत गावडे, मोहन पाटील, प्रशांत आपटेकर यांच्यासह तालुक्यातील तरुण उपस्थित होते.
पाटणे फाटा रस्त्याचे पॅचवर्क हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याच्या दुरावस्तेमुळे अपघातांची संख्या वाढली असून काही दिवसापूर्वीच एकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे जनतेच्या जीवाची किंमत लक्षात घेवून आता तरी प्रशासनाने जागे व्हावे. त्यांनी त्वरीत या रस्त्याचे थर्ड पार्टी इन्स्पेक्न करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनाची दखल घेत कालच सार्वजनिक विभागाच्या त्रयस्त पाहणीसाठी पथक नेमण्यात आले आहे. तसेच बांधकाम विभागाच्या कारवाईवर आता आपला विश्वास उरला नाही. त्यामुळे सार्वजनिक बाधकाम विभाग आणि गव्हर्नमेंन्ट पॉलिटेकनिक अथवा शिवाजी विद्यापीठाच्या डिओटी यांची वेगवेगळी पाहणी व्हावी असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावर येत्या आठ दिवसात त्रयस्त समितीकडून पाहणी केली जाईल असे आश्वासन बुरुड यांनी दिले.
चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा ते पारगड रस्त्याच्या दुरुस्तीविरोधात जनतेने ३ डिसेंबर २०१९ रोजी पाटणे फाटा येथे आंदोलन केले होते. त्यावेळी निकृष्ट पॅचवर्क अधिकाऱ्यांसमोरच उकरुन त्याची पोलखोल करण्यात आली होती. त्यावेळचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंढ व्हायरल झाला होता. त्यातून चंदगड बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार जनतेसमोर आला होता. त्यातून प्रचंढ नाचक्की होऊन थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाच्या वितीने देण्यात आले होते. त्यानुसार १६ डिसेंबर २०१९ रोजी ही पाहणी होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप ती पाहणी झाली नसल्याने पुन्हा कोल्हापूर बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर 'भीक मागो आंदोलन' करण्यात आले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत केवळ कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या संस्थांकडून पाहणी होऊन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment