बदनामीच्या कारणांमुळे उमगाव येथील तंटामूक्त अध्यक्षाचा विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू, नउ जणावर गुन्हा - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2020

बदनामीच्या कारणांमुळे उमगाव येथील तंटामूक्त अध्यक्षाचा विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू, नउ जणावर गुन्हा

शिवाजी विष्णु गावडे
चंदगड / प्रतिनिधी 
आपल्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने उमगाव गावासह तालुक्यात नाहक बदनामी झाली. या कारणावरुन तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी विष्णु गावडे (वय-47, रा. उमगाव, ता. चंदगड) यांनी शुक्रवारी 24 जानेवारी 2020 रोजी विष प्राशन केले होते. त्यांच्यावर बेळगाव येथील सीव्हील रुग्णांलयात उपचार सुरु होते. आज सकाळी साडेसात वाजता उपचार सुरु असताना ते मयत झाले. पतीच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याप्रकरणी पत्नी सावित्री गावडे यांनी जिल्हा परिषद सदस्यासह, पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अन्य सात अशा नऊ जणांविरोधात चंदगड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरुन नऊ जणांच्या विरोधात चंदगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चंदगड पोलिस ठाण्याच्या आवारात मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी नऊ जणांच्या अटकेच्या मागणीसाठी मांडलेला ठिय्या. 
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी – उमगाव येथील शिवाजी गावडे यांच्यावर चंदगड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. यामुळे उमगावसह चंदगड तालुक्यात आपली नाहक बदनामी झाली. या कारणावरुन शिवाजी गावडे यांनी 24 जानेवारी 2020 रोजी रात्री नऊच्या दरम्यान `इकोग्रार्ड` नावाचे विषारी औषध प्राशन केले. कुटुंबियांना याची माहीती मिळताच त्यांनी लागलीच त्यांना उपचारासाठी चंदगड ग्रामीण रुग्णांलयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी बेळगाव येथील सीव्हील रुग्णांलयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी साडेसात वाजता त्यांचा मृत्यू झाला. 
आपल्या पती विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करुन त्यांच्या मृत्युला नऊ जण कारणीभूत असल्याची फिर्याद सावित्री गावडे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. त्यावरुन नऊ जणांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी गोविंद निंगू गावडे, ज्ञानेश्वर गोविंद गावडे, राजाराम गोविंद गावडे, विरेंद्र विठ्ठल गावडे, शोभा विठ्ठल गावडे, संगिता राजाराम गावडे (सर्व रा. उमगाव, ता. चंदगड) व मानसिंग चव्हाण (चंदगड पोलिस ठाणे) या सात जणांना चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सटुप्पा गंगाराम पेडणेकर (रा. उमगावपैकी पेडणेकरवाडी, ता. चंदगड), सचिन सदानंद बल्लाळ (रा. चंदगड) यांचा शोध सुरु आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. 
मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर केलेली गर्दी. 
दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता बेळगाव येथून प्रेत आल्यानंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी  रुग्णवाहिकेसह प्रेत थेट चंदगड पोलिस ठाण्याच्या आवारात नेले. तेथे ठिय्या मांडत सर्व नऊ जणांना तातडीने अटक करा अन्यथा मृतदेह पोलिस ठाण्यासमोरुन हलविणार नसल्याची भूमिका घेतली. यामध्ये महिलावर्गाने आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून यापूर्वीच जादाची पोलिस कुमत गडहिंग्लज येथून मागून घेण्यात आली होती. गडहिंग्लजचे पोलिस उपअधिक्षक अंगद जाधवर हे चंदगड पोलिस ठाण्यात हजर होते. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मयताचे नातेवाईक नऊ जणांच्या अटकेच्या मागणीवर ठाम होते. याचवेळी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून प्रेत बाहेर काढून पोलिस ठाण्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर व पोलिसांनी समजून काढल्याने प्रेत पुन्हा रुग्णवाहिकेमध्ये ठेवले. ठाण्यासमोर गोंधळाचे वातावरण होते. अंगद जाधवर यांनी मृताच्या नातेवाईकांना व काही ग्रामस्थांना पोलिस ठाण्यात नेऊन चर्चा केली. चर्चेनंतर नातेवाईकांची समजूत काढून घटनेची माहीती दिली. सात जणांना ताब्यात घेतले असून उर्वरीत दोघांचा शोध सुरु आहे. त्यांनाही ताब्यात घेतले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक ठाण्यातून बाहेर पडले. ठाण्याच्या बाहेरील नातेवाईकांची समजूत काढून उर्वरीत दोघांनाही ताब्यात घेण्याचे आश्वासन श्री. जाधवर यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत अंत्यविधीसाठी गावी घेवून गेले. 

No comments:

Post a Comment