देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीची बीजे राजमाता जिजाऊनी पेरली - श्रीकांत पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2020

देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीची बीजे राजमाता जिजाऊनी पेरली - श्रीकांत पाटील

आझाद ग्रुप कोल्हापूर मार्फत कानुर येथे गाथा वीरांची व्याख्यान व देशभक्ती गीते
कानूर येथे आझाद ग्रुप आयोजित व्याख्यानमाला प्रसंगी बोलताना श्रीकांत पाटील सोबत अखलाक मुजावर, बाबुराव खडके, कुंडलिक राणे आदी.
चंदगड / प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाची बिजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊनी छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून पेरली. त्यावर भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारक हुतात्म्यांनी कळस चढवला. असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक श्रीकांत व्ही. पाटील (कालकुंद्री) यांनी केले  आझाद ग्रुप कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय व्याख्यानमाला अंतर्गत कानूर खुर्द ता. चंदगड येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त 'गाथा क्रांतिकारकांची' या विषयावर व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी माजी सैनिक कुंडलिक महादेव राणे होते. 
कानूर खुर्द येथे गाथा क्रांतिकारकांची व्याख्यानमाला प्रसंगी आझाद ग्रुपच्या क्रांतिकारक कॅलेंडरचे प्रकाशन करताना श्रीकांत पाटील, बाबुराव खडके, अखलाकभाई  मुजावर, बी. जी. जगताप आदी मान्यवर
स्वागत तालुका प्रमुख तानाजी गावडे यांनी केले. प्रास्ताविकात आजाद ग्रुपचे संस्थापक बाबुराव खडके यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. राजमाता जिजाऊ. स्वामी विवेकानंद, शहीद भगतसिंग, वि दा सावरकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन श्रीकांत पाटील व माजी सैनिक गोविंद सुभेदार यांनी केले. यावेळी पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले, ``शिवकाळापासून ते १८५७ चा उठाव, १९४२ची भूमिगत चळवळ स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत योगदान देणाऱ्या शिवाजी, संभाजी, तानाजी, बाजी, मुरारबाजी, पासून इंग्रजांच्या विरोधात १८५७ पूर्वी सशस्त्र उठाव करणारे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, लहूजी साळवे यांचे कार्य विशद केले.  १८५७ च्या राष्ट्रीय सशस्त्र उठावातील विविध योध्दे व त्यानंतर  भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, मदनलाल धिंग्रा, वि दा सावरकर, बिरसा मुंडा, वासुदेव बळवंत फडके, अनंत कान्हेरे, चाफेकर बंधू, मंगल पांडे, त्याचबरोबर भूमिगत चळवळ, ऑगस्ट क्रांती चळवळ, चंद्रशेखर आजाद यांच्या आझाद दस्त्यातील गोमाजी पाटील झिपरु गवळी, नारायण नागो पाटील, तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार मधील क्रांतिकारक.  नेताजींच्या आझाद हिंद सेना, महात्मा गांधींच्या छोडो भारत चळवळीतील सदस्य व स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्यवीरांच्या कार्याची गाथा विशद केली. देशातील जनतेला शैक्षणिक सामाजिक स्वातंत्र्य देणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकराजा शाहू, डॉ. आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा, जगद्गुरू संत तुकाराम व इतर संतांच्या समाजसुधारक कार्याचा आढावा घेतला.`` 
यावेळी त्यांनी तरुणांनी विविध व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच मोबाईल सारख्या साधनांचा स्वतःच्या, घरच्या पर्यायाने देशाच्या उन्नतीसाठी योग्य पद्धतीने वापर करावा. चौफेर व नियमित वाचन करावे असे आवाहन केले. यावेळी संस्थेच्यावतीने शिष्यवृत्ती परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्या आर्यन गावडे, कृष्णा गावडे, भार्गवी गावडे, कार्तिकी झेंडे या पाचवीतील तर निशांत गावडे, सुशांत झेंडे, माधवी पाटील या आठवीतील विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले. यानंतर कोल्हापूर येथील नादब्रह्म संगीत रजनी चा देशभक्ती, भावगीत, गझल, शास्त्रीय संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. यातील गायक नागेश पाटील, बासरीवादक अमोल राबाडे, तबलावादक अभिजीत पाटील यांनी आपल्या गायन- वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमास अशिष गावडे, शिवराम गावडे, वैभव सुभेदार, अशोक गावडे, अर्जुन बिरजे आदींसह ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात व्याख्याते अखलाक मुजावर (महागाव) यांनी केले. आभार कानुर केंद्राचे केंद्रप्रमुख बी. जी. जगताप यांनी मानले.

No comments:

Post a Comment