चंदगड तहसिल कार्यालयात अपंगाचे प्रश्न मांडताना गणेश फाटक व अपंग बांधव. |
चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतीनी अपंगाना देय असलेल्या अनुदानाचा लाभ त्वरित दयावा ,अशा सुचना तहसीलदार विनोद रणवरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केल्या असून तसे पत्रही देण्याचे आश्वासन काल तहसिल कार्यालयात झालेल्या अपंग आणि विधवा-परितक्त्या महिलांच्या बैठकीत तहसीलदारांनी दिले .
चंदगड तालुक्यातील अपंगावर प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपंचायतीकडून अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ गेल्या सोमवारी चंदगड तहसील कार्यालयावर तालुक्यातील अपंगानी मोर्चा काढला होता . त्यावेळी बैठक घेऊन अपंगाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले होते. त्यानुसार काल तहसील कार्यालयात बैठक झाली . ग्रामपंचायतीना अनुदानातील ५ टक्के खर्च अपंगासाठी - करण्याचे बंधनकारक असूनही त्याचे पालन होत नसल्याची तक्रार करण्यात आली.अपंगाना घरफाळ्यात ५० टक्के सवलत देण्याचा शासन निर्णय असून त्याचीही अंमलबजावणी होत नसल्याचे यावेळी अपंग चे तालुकाध्यक्ष आण्णाप्पा गोरल यानी सांगितले.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये अपंगाना आरक्षित आसने असूनही त्यावर अपंगाना बसायला मिळत नाही.अपंगासाठी आरक्षित आसनांची माहिती देणारी अक्षरेही काही गाड्यातून अस्पष्ट झाली आहेत. केंद्र सरकारने अपंगाना दिलेले ओळखपत्र एसटीच्याद्यावे प्रवासातील सवलतीसाठी ग्राह्य धरावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. अपंगाच्या मदतीसाठी चंदगडच्या प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र कक्ष सुरू करावा , अशी सुचना मांडण्यात आली. घरकुले आणि शौचालयांचा लाभ देताना विधवा महिलांना प्राधान्य दयावे . घरकुल वा शौचालयासाठी प्रस्ताव दाखल झाल्यावर त्याची तातडीने निर्गत व्हावी . नांदवडे येथील दोन महिलांना विधवा पेन्शन मंजूर होऊन एक वर्ष झाले , मात्र प्रत्यक्षात त्या महिलांना मंजुरीचे पत्रच गेले नाही . घरकुलात प्राधान्य एक वर्ष त्या पेन्शनविना वंचित राहिल्या.जिल्हा बँकेत सेव्हींगची पासबुके भरून दिली जात नाहीत.वाढीव पेन्शनची माहिती ही वेळेत दिली जात नाही ,अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या .अपंग आणि विधवा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या त्या खात्याना पत्राद्वारे कळवले जाईल असे आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, नायब तहसीलदार डी. एम. नांगरे, चंदगड आगारप्रमुख विजय हवालदार, पोलीस निरीक्षक अशोक सातपुते, तानाजी सावंत, लक्ष्मण बेनके, अमोल कांबळे, सतीश कांबळे, सिताराम गावडे, संदीप पाटील, आणाप्पा गोरल, विठ्ठल वांद्रे, महादेव गावडे, नारायण सुतार, मारूती भाटे, राजश्री पिटूक, सरिता पाटील, गंगुबाई गावडे, संजीवनी सुतार, गीता बैलूरकर, आप्पाण्णा चिंचणगी आदी अपंग बांधव यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment