मजरे कार्वे / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघाने दुधाळ जनावरांना होणारे साथीचे तसेच इतर विशिष्ठ प्रकारचे आजार यावर महाराष्ट्रात प्रथमच आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरु केले आहेत. याकरिता कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ,कोल्हापूर आणि बेंगलोर येथील आयुर्वेदिक विद्यापीठ ( दि युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्स-डिसीप्लीनरी हेल्थ सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी) सोबत करार केला आहे. याअंतर्गत आतापर्यंत गोकुळ दुध संघाच्या ३२ पशुवैध्यकीय अधिकाऱ्यांना बेंगलोर येथे प्रशिक्षण दिले आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अवती भोवती सहज उपलब्ध असणारे कोरफड,तुळस,शेवगा,कडुलिंब, कडीपत्ता, मेहंदी,वड,पिंपळ,उंबर इत्यादी प्रकारच्या वनस्पती आणि स्वयंपाकघरात उपलब्ध असणारे गुळ,हळद,काळी मिरी, लसूण,कांदा,नारळ,चिंच,जिरे,धणे,हिंग,मेथी,वेलदोडा,दालचिनी,खडीसाखर, अशा वस्तूंचा वापर करून जनावरांना कोणत्याही दुष्परिणामाशिवाय घरच्याघरी उपचार करता येणार आहेत.
यामध्ये लाळ खुरकत, स्तन ग्रंथीमधील सूज म्हणजे मस्टायटीस, आंतड्याचा दाह अर्थात आंत्रशोय, स्तनशोय, स्तनावरील पुरळ, गर्भाशय संक्रमण, तसेच आम्लपित्त, पोटातील वात, ताप, हगवण शरीरावरील जखमा अशा अंदाजे १७ ते १८ प्रकारच्या विविध आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय घरच्याघरी करणे शक्य झाले आहे.
जनावरांनी घेतलेल्या आहार आणि औषधांचा परिणाम त्याच्या दुधावर होत असतो. जनावर आजारी पडल्यानंतर त्याला दिलेल्या किंवा वापरलेल्या अॅण्टीबायोटीक आणि इंग्रजी औषधांचे अवशेष दुधात उतरत असतात. त्याचे परिणाम मानवी शरीरावर होत असतात. परंतु आयुर्वेदिक उपचार पद्धतीने जनावरे निरोगी राहतात त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि दुष्परिणाम होत नाहीत पर्यायाने दुधाची वाढ होते तसेच त्याची गुणवत्ता वाढते.यासाठी गोकुळ दुध संघाने याचा पुढाकार घेतला आहे. यामुळे दुध उत्पादकांचा वेळ आणि उपचारावर होणारा खर्च हे दोन्ही वाचणार आहे.पर्यायाने दुधाच्या उत्पादन खर्चात कपात होणार आहे.
भविष्यात याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यासाठी गोकुळ दुध संघाच्या महिला नेतृत्व विकास कार्यक्रमातील महिला स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. प्रशिक्षित झालेल्या महिला गावपातळीवर काम करणारे महिला बचत गट आणि आहार संतुलन कार्यक्रमातील स्वयंसेविका इत्यादींना प्रशिक्षित करून जनावरांच्या विविध आजारांवर गावपातळीवरच औषध तयार करून त्याचा उपचारासाठी वापर करतील असे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमामुळे भेसळमुक्त, चव आणि अशा अनेक खास गोष्टीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोकुळ दुधात आता आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेची भर पडली आहे.
No comments:
Post a Comment