नियोजित ट्रामा केअर सेंटरचे काम सुरु करा, अन्यथा गुरुवारपासून बेमुदत धरणे, संघर्ष कृती समितीचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2020

नियोजित ट्रामा केअर सेंटरचे काम सुरु करा, अन्यथा गुरुवारपासून बेमुदत धरणे, संघर्ष कृती समितीचा इशारा

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील नियोजित ट्रामा केअर सेंटरचे काम सुरु करा, .याबाबतचे निवेदन वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुहास साने यांना देताना संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष गणेश फाटक व अन्य पदाधिकारी.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक वसाहत हद्दीतील पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे नियोजित ट्रामा केअर सेंटर तातडीने सुरु करण्याची मागणी संघर्ष कृती समितीने चंदगड ग्रामीण रुग्णांलयाचे अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे. नियोजित ट्रामा केअर सेंटरचे काम सुरु करा, अन्यथा गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष कृती समतीने दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 
महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा सभापती स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे प्रयत्नातून या भागातील ग्रामीण जनतेला आरोग्य सेवेचा सुलभ लाभ घेता यावा. यासाठी ट्रॉमा केअर सेंटर (सुसज्य रुग्णांलय) मंजूर झाले होते. मात्र हे ट्रॉमा सेंटर जागे अभावी रखडले होते. त्यासाठी तत्कालीन आमदार संध्यादेवी  कुपेकर यांच्या प्रयत्नातुन हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये येथे अडीज एकर जागा उपलब्ध करुन दिली. मात्र त्यासाठी लागणारी 25 लाख इतकी रक्कम आरोग्य विभाग भरण्यास सक्षम नसल्याचे कळविण्यात आले. त्यातून मार्ग काढण्यासाठी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी स्वतः व सामाजिक वर्गणी मधून 25 लाख भरायला तयार असल्याचे सरकारला कळवले. मात्र राज्य सरकारने  असे वैयक्तिक पैसे भरता येत नसल्याचे सांगितले. तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्याशी बैठक करून यावरती तोडगा काढायचे ठरवले होते. मात्र अद्यापही याकडे सरकारी यंत्रणेते दुर्लक्ष आहे. त्यामुळे या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष कृति समिती चंदगड यांच्या वतीने गुरुवार 12 मार्च 2020 पासून बेमुदत धरणे आंदोलन धरण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन चंदगड ग्रामीण रुग्णांलयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुहास साने यांना देण्यात आले आहे. निवेदनावर अध्यक्ष गणेश फाटक, उपाध्यक्ष आनंदराव कांबळे, कार्याध्यक्ष दौलत दळवी, सचिव आकाश भोगण, कोषाध्यक्ष जोतिबा गोरल यांच्या सह्या आहेत. 


No comments:

Post a Comment