नागवे (ता. चंदगड) येथील शेतकऱ्यांनी कृषीपंपाना आठ तास सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या मागणीसाठी विज वितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरुन निवेदन दिले. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील नागवे व माडवळे येथील शेतकऱ्यांनी कृषीपंपाना आठ तास विजपुरवठा करावा या मागणीसाठी महावितरण कंपनीवर धडक दिली. यावेळी विद्युत कंपनीचे उपअभियंता श्री. लोधी अनुपस्थित असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी काही काळ कार्यालयातच गोंधळ घातला. यावेळी दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी अखेर मागण्यांचे निवेदन देवून आपली मागणी विद्युत वितरणपर्यंत पोहोचवली.
नागवे येथील कृषीपंपाना दिवसभरात आठ तास सुरळीतपणे वीजपुरवठा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे पाणी असूनही पिके वाळत असल्याची अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. निवेदनावर गुंडू गुरव, सुभाष गुरव, मंगेश नाडगौडा, सोपान म्हाडगुत, संभाजी गुरव यांच्यासह शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
माडवळे (ता. चंदगड) येथील कृषी पंपाना नियमानुसार आठ तास विजपुरवठा सुरळीत करावी. माडवळे गावाशेजारी वनगाई, गवेरेडे, अस्वल व हत्ती यांनी बाधीत आहे. विज वितरण कडून सद्यस्थितीला दिवसभराच्या चोवीस तासात दोन ते तीन तासच कृषीपंपाना वीजपुरवठा केला आहे. त्यामुळे नियमानुसार किमान आठ तास वीजपुरवठा करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. माडवळे हे गाव डोंगराळ व जंगलात असल्याने या भौगोलिक परिस्थिती व जंगली प्राण्यांचा वावर यामुळे या भागात कृषीपंपाना दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी उपअभियंता चंदगड यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनावर मनोहर पाटील, रवळन रेळेकर, रोहीत गावडे, शिवाजी मसुरकर, सुरेश पार्शी, रमेश मसुरकर, नामदेव सुतार यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment