नेहमी गजबजलेल्या हलकर्णी, पाटणे फाटा, कार्वे परिसरात शुकशुकाट, जनता संचारबंदीला जनतेचा प्रतिसाद, संपूर्ण व्यवहार ठप्प - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2020

नेहमी गजबजलेल्या हलकर्णी, पाटणे फाटा, कार्वे परिसरात शुकशुकाट, जनता संचारबंदीला जनतेचा प्रतिसाद, संपूर्ण व्यवहार ठप्प

दोन दिवसांपासून पाटणेफाटा असा निर्मनुष्य झाला आहे.
मजरे कार्वे / प्रतिनिधी
संपूर्ण भारत देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे केंद्र शासनाने जनता संचारबंदी चेआवाहन केले कोरोणा व्हायरसची साखळी तोडण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शहरातील नागरिकांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये त्याची जागरूकता आली आहे. जनता संचारबंदी ला कार्वे परिसरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. या परिसरातील पाटणे फाटा,हलकर्णी फाटा, माणगाव, तुर्केवाडी, शिनोळी फाटा या ठिकाणावरील शंभर टक्के व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सकाळी सातपासून त्या संपूर्ण परिसरात शुकशुकाट दिसत होता. बेळगाव - वेंगुर्ला या प्रमुख राज्य मार्गावर तुरळक वाहने वगळता वाहतूक एकदम शांत होती. या परिसरातील सर्वच बाजारपेठा निर्मनुष्य झालेल्या दिसत होत्या.
मजरे कार्वे येथील नेहमी गजबजलेला चौकात भयान शांतता आहे.
                                                     पाटणे फाटा दोन दिवस बंदच.
कोरोणा व्हायरसच्या प्रसारावर आळा आणण्यासाठी कार्वे परिसरात गेल्या दोन दिवसांपासूनच लाँक डाऊन करण्यात आले आहे. पाटणे फाटा हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सर्व आठवडी बाजार बंद झाल्यामुळे पाटणे फाट्यावर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत होती. मजरे कार्वे व तावरेवाडी ग्रामपंचायतीने संभाव्य धोका ओळखून शनिवार सकाळपासूनच पाटणे फाट्यावरील सर्व व्यवहार बंद केले आहेत. आज हलकर्णी फाट्या वरील ही शंभर टक्के व्यवहार बंद होते.
 नेहमी गजबजलेल्या हलकर्णी फाट्यावर असा शुकशुकाट होता.
                                       भाजी दुकाने अनिश्चित काळासाठी बंद.
पाटणे फाट्यावर  मोठ्या प्रमाणात भाजी दुकानं झाली आहेत. या परिसरातील बहुतेक गावांमधील नागरिक भाजी खरेदीसाठी येथेच येतात. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी वाढत होती. येथील भाजी दुकाने बंद केल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे, म्हणून येथील भाजीची सर्व दुकाने ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय सुरू करू नयेत. पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळ बंद ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारपासून अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर व्यवहारही बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
                                      चाकरमान्यांच्या आगमनावर बारीक लक्ष.
या परिसरातील नोकरी-व्यवसायानिमित्त पुणे मुंबईसारख्या ठिकाणी असलेल्या व्यक्ती पुन्हा माघारी येत आहेत. त्यामुळे येथील माणगाव आरोग्य केंद्राचे कर्मचारी या परिसरातील सर्वच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या चाकरमान्यांच्या आगमनावर बारीक लक्ष ठेवून आहेत. आलेल्या व्यक्तींना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
                                   हलकर्णी एमआयडीसी मधील उद्योग केले बंद
कोरोणा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हलकर्णी एमआयडीसी मधील बरेच उद्योग बंद अवस्थेत आहेत. मात्र काही उद्योग मनमानी पद्धतीने सुरू आहेत. येथील पेपर मिल सुरू करण्यात आल्याची बातमी लागताच अनिल तळगुळकर, भरत गावडे, पांडुरंग बेनके, उदय पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कंपनी गाठली व कंपनी बंद पाडण्यास भाग पाडले. येथे काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातून कामगार आले आहेत. अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे आरोग्य विभागानेही तात्काळ चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment