![]() |
चंदगड शहरातील नेहमी वर्दळ व गर्दी असलेला संभाजी चौक जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर निमनुष्य दिसत होता. |
चंदगड / प्रतिनिधी
संपूर्ण भारत देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे केंद्र सरकारने जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे. शहरातील नागरिकांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये त्याची जागरूकता आली आहे. जनता कर्फ्युला चंदगड शहरासह तालुक्यातील खेड्या-पाड्यात कडकडीत बंद पाळून जनता कर्फ्यु यशस्वी करण्यात आला. कोरोनाबाबत जनजागृतीमुळे नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळल्याने पोलिसांनी कारवाई करण्याची संधी दिली नाही.
![]() |
चंदगड शहरातील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे बाजारपेठेत भयान शांतता होती. |
चंदगड तालुक्यातील चंदगड, कोवाड, अडकूर, पाटणे फाटा, शिनोळी, माणगाव, हलकर्णी फाटा, कुदनुर हेरे, पाटणे, तुर्केवाडी येथील बाजारपेठा नेहमी गजबजलेल्या असतात. मात्र आजच्या जनता कर्फ्युने सर्वत्र शुकशुकाट होता. अनेकदा विविध कारणासाठी बंद पुकारला जातो. त्याला नागरीक काहीवेळी संमिश्र प्रतिसाद असतो. मात्र या जनता कर्फ्युला नागरीकांनी स्वत:च्या बचावासाठी एक दिवस घरात राहून कडकडीत बंद पाळून शंभर टक्के प्रतिसाद दिला. चंदगड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सरकारी कामे व अन्य खरेदीसाठी लोकांची गर्दी असते. चंदगड शहराच्या संभाजी चौक नेहमी गर्दीने फुललेला असते. आज मात्र तो निर्मनुष्य झाल्याने भयान शांतता होती.
कार्वे परिसरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. या परिसरातील पाटणे फाटा, हलकर्णी फाटा, माणगाव, तुर्केवाडी, शिनोळी फाटा या ठिकाणावरील शंभर टक्के व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सकाळी सातपासून त्या संपूर्ण परिसरात शुकशुकाट दिसत होता. वर्दळीचा बेळगाव- वेंगुर्ला मार्गही आज दिवसभर शांत होता. या परिसरातील सर्वच बाजारपेठा निर्मनुष्य झालेल्या दिसत होत्या.
तालुक्यातील कोवाड परिसरातील किणी-कर्यात भागातील सर्वच गावातून शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. नेहमी गजबजलेली असणारी कोवाड बाजारपेठ महापुराच्या घटनेनंतर दुसऱ्यांदा ठप्प झाल्याची दिसत आहे. केवळ पक्षांचा आवाज ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे. शनिवारीच परिसरातील सर्व ग्रामपंचायतीनी ध्वनिप्रक्षेपकाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना बंदच्या सुचना दिल्या होत्या. आज सकाळपासून कोवाड परिसरातील तेऊरवाडी, दुंडगे, निट्टूर, कुदनुर, किणी, कालकुंद्री, कागणी, राजगोळी, म्हाळेवाडी, माणगाव आदि गावातील सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी दिवसभराच्या कामाला ब्रेक देवून घरीच राहणे पसंत केले. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीने ही चांगले प्रबोधन केल्याने या कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
चंदगड तालुक्यातील अनेक लोक नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी असलेल्या व्यक्ती पुन्हा माघारी येत आहेत. यांच्यावर आरोग्य विभाग, गावातील पोलिस पाटील, आशा सेविका या चाकरमान्यांच्या आगमनावर बारीक लक्ष ठेवून आहेत. आलेल्या व्यक्तींना घरातून बाहेर पडण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.
चंदगड तालुक्यातील एकाचे स्पॅम्पल तपासणीसाठी पुण्याला
चंदगड तालुक्यातील दुबई येथे कामाला गेलेले 21 जण चंदगड तालुक्यामध्ये परतले आहे. त्यातील एकाला सर्दी व खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने त्याला गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णांलयात विलगीकरण कक्षामध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून त्यांचे सॅम्प्पल घेवून ते तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहे. त्याचा तपासणी अहवाल सोमवारी (ता. 4) मिळणार असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment