ग्रामीण भागातील मल्लांचे कुस्ती आखाड्याकडे लक्ष, कोरोनामुळे मैदाने होताहेत रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2020

ग्रामीण भागातील मल्लांचे कुस्ती आखाड्याकडे लक्ष, कोरोनामुळे मैदाने होताहेत रद्द

संग्रहित छायाचित्र
कोवाड / प्रतिनिधी
कुस्ती मैदाने वेळेत झाली नाहीत, तर वर्षभर घेतलेली मेहेनत वाया जाणार, अशी खंत ग्रामीण भागातील मल्लांच्यातून व्यक्त होत आहे. गावागावातून होणाऱ्या कुस्ती मैदानासाठी प्रत्येक वर्षी ग्रामीण भागातील मल्ल तयारी करत असतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुस्ती मैदाने रद्द झाल्याने ग्रामीण भागातील मल्लांचे कुस्ती आखाड्यांच्याकडे डोळे लागले आहेत. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर कुस्ती मैदाने भरविली जातील का, असाही प्रश्न  मल्लांच्यातून  विचारला जात आहे. 
दर वर्षी चंदगड तालुक्याच्या पूर्व व सीमा भागात कुस्ती मैदानांचे आयोजन केले जाते. मार्च ते मे महिन्यापर्यंत हे कुस्ती आखाडे होत असतात. गावपातळीवर होणाऱ्या या मैदानाना कोल्हापूर, बेळगांव, इचलकरंजी यासह कर्नाटक व चंदगड तालुक्यातील मोठ्या संख्येने मल्ल हजेरी लावतात. कुस्ती आखाड्याना कुस्ती शौकीकांचीही मोठी गर्दी असते. पण यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच गावातून होणारी कुस्ती मैदाने रद्द केली आहेत. काहीनी पुढे ढकली आहेत . चंदगड तालुक्यात मांडेदुर्ग, कोवाड, तेऊरवाडी, निट्टूर, कुदनूर, मलतवाडी, तुडये तर सीमा भागात कडोली, कंग्राळी, यळूर यासह परिसरात कुस्ती मैदानांचे आयोजन केले जाते. विजयी मल्लाना रोख रकमेसह वस्तू स्वरूपात बक्षीस देऊन मल्लांचा गौरव केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील आखाड्यांचे मल्लांच्यात विशेष आकर्षण असते. कुस्तीची परंपरा जीवंत ठेवण्यासाठी लोकवर्गणीवर ही मैदाने स्थानिक नागरिकांनी सुरू ठेवली आहेत. निटटूर येथील कुस्ती मैदानाला तर शंभर वर्षाची परंपरा आहे. आजही त्याठिकाणी ग्रामस्थ लोकवर्गणीतून निधी जमा करुन कुस्ती मैदान आयोजित करतात. त्यामुळेच ग्रामीण भागातील कांही तरुण आजच्या इंटरनेटच्या जमाण्यातही कुस्ती क्षेत्राकडे वळू लागल्याने कुस्तीची परंपरा येथे जीवत राहिली आहे. कुस्ती मैदानासाठी येथील मल्ल वर्षभर मेहेनत घेतात. यासाठी आर्थिक भारही सहन करतात. कांहीनी चांगल्या दर्जाचे मल्ल घडविण्यासाठी मोठया तालमीतून मुलाना ठेवले आहे. त्यामुळे हे मल्ल वर्षातून एकदा होणाऱ्या या मैदानांची ते वाट पाहत असतात. पण यावर्षी कोरोनामुळे सर्वच ठिकाणची मैदाने रद्द केल्याने वर्षभर केलेली मेहेनत वाया जाणार याची धास्ती मल्लाना लागली आहे. 


No comments:

Post a Comment