प्रसार होण्यापूर्वीच पालिकांनी सीमा बंद करुन शहर सुरक्षित ठेवा - जिल्हाधिकारी दौलत देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2020

प्रसार होण्यापूर्वीच पालिकांनी सीमा बंद करुन शहर सुरक्षित ठेवा - जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर -
कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर कंटेन्मेंट झोन करुन प्रतिबंध करण्यापेक्षा प्रसार होण्यापूर्वीच महापालिका आणि नगरपालिकांनी एक किंवा एकापेक्षा जास्त प्रभागांचे झोन तयार करुन सीमा बंद करा. जीवनावश्यक वस्तू खरेदी व अत्यावश्यक बाबींसाठीची हलचाल प्रभागापूर्तीच मर्यादित करा. आपले शहर सुरक्षित ठेवायची जबाबदारी घ्या, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. 
  जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, महसूलचे उप जिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, प्रांताधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.
  जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी बाधित रुग्ण सापडल्यानंतर कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. त्यानंतर नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला. कोरोनाची लागन झाल्यानंतर अशा झोन बंदी करण्यापेक्षा कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी महापालिका, नगरपालिका यांनी  प्रभाग समितीच्या मदतीने एक किंवा एकापेक्षा जास्त प्रभागांसाठी झोन तयार करावेत आणि त्याच्या सीमा बंद कराव्यात. ही संचारबंदी 3 मे पर्यंत लागू असणार आहे. या झोनच्या सीमा बॅरिकेड्स लावून बंद कराव्यात. यात प्रभाग समित्यांनी पूर्ण सहभाग द्यावा. 
  नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी या झोनच्या बाहेर जावू नये. वैद्यकीय तातडीसाठी किंवा अत्यावश्यक सेवा पुरवठादार यांना एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये जाता येईल. मात्र, ज्या जीवनावश्यक बाबी आपल्या झोनमध्ये उपलब्ध आहेत त्या खरेदीसाठी दुसऱ्या झोनमधून आणण्यास वाहन वापरण्यास बंदी लागू राहील. यामुळे दुर्देवाने विषाणूचा प्रादुर्भाव एखाद्या भागात झाला तर त्याचा संसर्ग इतर विभागात होणार नाही व दोन्ही भाग एकमेकास होणाऱ्या संसर्गापासून सुरक्षित राहतील. ग्रामीण भागात ग्राम समित्यांनी आप-आपल्या गावांच्या सीमा नियंत्रित करुन अनावश्यक हालचाल थांबविली आहे. परंतु, शहरात मात्र नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीचे कारण पुढे करुन मुक्त संचार करीत आहेत, हे योग्य नाही. यामुळे पोलीस विभागास फार मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त करावी लागत आहेत. याचाही नागरिकांनी गांभिर्याने विचार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे. 
  संचारबंदी लागू केल्यानंतरही नागरिकांनी अद्यापही विनाकारण गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी गांभिर्याने घेतले नाही त्यामुळे महापालिका-नगरपालिकांना झोन करुन सीमा बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी उद्यापासूनच करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहर सुरक्षित ठेवण्यासाठी जे निर्णय स्थानिक स्तरावर घ्यायचे असतील ते घ्या. पोलीस यंत्रणेची मदत घ्या आणि शहर सुरक्षित ठेवा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 
                      महापालिका क्षेत्रात तात्काळ अंमलबजावणी-महापालिका आयुक्त डॉ. कलशेटट्टी
  जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेशाची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात तात्काळ करण्याच्यास सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येत असून उद्यापासून बॅरिकेड्स लावून या झोनच्या सीमा बंद करण्यात येत आहेत. नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये. निर्माण करण्यात आलेल्या झोनमध्येच नागरिकांना अत्यावश्यक तसेच जीवनावश्यक बाबींसाठी आपला वावर ठेवावा लागेल. संचारबंदीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment