बेळगाव जिल्ह्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सीमेवर प्रशासनाचा वॉच - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2020

बेळगाव जिल्ह्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सीमेवर प्रशासनाचा वॉच

राजगोळी : येथे पोलिसानी रस्त्यावर लाकडी कोंडके टाकून कर्नाटकात जाणारा मार्ग असा रोखला आहे.
संपत पाटील, चंदगड / प्रतिनिधी
बेळगांव जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात १७ रुग्णांची भर पडल्याने महाराष्ट्र हद्दीतील कर्नाटकाला लागून असलेल्या चंदगड तालुक्यातील सर्व रस्ते अत्यावश्यक सेवांसह संपूर्ण वाहतूकीसाठी तातडीने बंद करण्याचा आदेश प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिला. तहसिलदार विनोद रणावरे यांनी सिमेवरील १९ गावाना अलर्ट राहण्याच्या सचना दिल्या असून कर्नाटक सीमेवर वॉच वाढविला आहे. त्यामळे कर्नाटकात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरुन नागरिकांनी दक्षता समितीच्यावतीने जागता पाहरा ठेवला आहे.
बेळगावपासून चंदगड तालुक्याची हद्द केवळ आठ ते दहा किलोमिट अंतरावर आहे. पण कर्नाटक - महाराष्ट्र हद्दीवर चंदगड तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीची गावे आहेत. बाजारपेठा आहेत. तसेच तालुक्यातील लोकांचा बेळगाव बाजारपेठेशी जवळचा संबंध आहे. सीमा भागात पै, पाहणे आहेत. त्यामुळे नेहमी तालुक्यातील लोकांची कर्नाटकात ये - जा सुरु असते. गेल्या आठवड्यात कर्नाटकातील बेळगुंदी येथे कोरोना रुग्ण सापडल्याने तालुक्यातील ११ गावे सील केली आहेत. परिसरातील काही लोकांच्यावर प्रशासनाने लक्ष ठेवले आहे. सर्व रस्ते बंद करुन वाहतूक पूर्णता बंद केली आहे. गुरूवारी पुन्हा बेळगाव जिल्ह्यात १७ रुग्ण आढळून आले. त्यामध्ये संकेश्वर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे प्रांताधिकारी पांगारकर यांनी तातडीने अत्यावश्यक सेवांसह संपूर्ण वाहतूकीसाठी आंतरराज्य सीमा बंद करण्याचा आदेश पारीत केला. संकेश्वर पासून चंदगडची हद्द जवळ असल्याने प्रशासनाने तातडीने खबरदारी घेतली आहे. यामध्ये कोलीक, म्हाळुगे खालसा, मळवीवाडी, तुडये,  सरोळी, ढेकोळीवाडी, शिनोळी बुद्रुक, शिनोळी खुर्द, देवरवाडी, कोलगे, होसूर, किटवाड, दिंडलकोप, कुदनूर, तळगुळी, राजगोळी बुद्रूक, राजगोळी खुर्द, चनेहट्टी, यर्तनहट्टी ही गावे कॅन्टोन्मेंट झोनमध्ये येत असल्याने त्याठिकाणच्या लोकाना सर्तक राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच यापूर्वी कर्नाटकातून आलेल्यांची व गेलेल्यांची चौकशी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. बेळगांव मार्गावरील होसूर व दड्डी मार्गावरील चन्नेटी येथे पोलिसानी पहारा ठेवला आहे .

                                                 या गावांच्यावर विशेष लक्ष.....
चंदगड तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील नरगहे . यर्तनहट्टी राजगोळी तिरमाळ , दिडलकोप , कामेवाडी , राजेवाडी गणेशवाडी या गावांतील नागरिकांचा बहुतांशी संपर्क हा कर्नाटकात जास्त आहे . त्यामुळे येथील नागरिकानी अलर्ट राहण्याची गरज आहे . तसेच प्रशासनाने या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत केले पाहिजे .

                                                    हे जोड मार्ग बंद व्हावेत .....
चोटी , राजगोळी दिडलकोप , कुदनूर , किटवाड , तिरमाळ , नरगट्टे या गावातून कर्नाटकात जाणारे सर्व जोड रस्ते बंद झाले पाहिजे . हे रस्ते खुले राहिल्यास या मार्गावरून वाहतूक सुरू राहणार आहे .

No comments:

Post a Comment