चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीचे पुनरागमन, कानुर व सडेगुडवळे परिसरात नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2020

चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीचे पुनरागमन, कानुर व सडेगुडवळे परिसरात नुकसान

कानुर खुर्द (ता. चंदगड) येथे टस्कर हत्तीने केळीचे नुकसान करुन बैलगाडी पलटी केली. 
चंदगड / प्रतिनिधी
गेल्या एक महिन्यापासून आजरा तालुक्यात गेलेल्या टस्कर हत्तीचे चंदगड तालुक्यात कानुर बुद्रुक मार्गे सडेगुडवळे भागात पुनरागमन झाले. मौजे कानूर येथील शेतकरी पांडुरंग वनारी व कृष्णा गावडे यांचे झालेल्या ऊस व केळी झाडांचे नुकसान केले. सडेगुडवळे येथे माडांच्या झाडांचेही हत्तीने नुकसान केले. शिवारात असेलली बैलगाडीही पलटी केली. 
चंदगड तालुक्याला हत्तींचे संकट हे पाजवीला पुजले आहे. करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना त्यातच टस्कर हत्तीचे चंदगड तालुक्यात आगमन झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कानुर येथे झालेल्या ऊस व केळी झाडांचा पंचनामा वनपाल कानुर खुर्द ए. डी. वाजे यांनी केला. सडेगुडवळे गावातील लोकवस्ती शेजारी असलेल्या माडांच्या झाडांची हत्तीकडून झालेल्या नुकसानीची पाहणी देखील कर्मचाऱ्यांनी केली. वनहत्ती गाव शिवारात घरांच्या जवळ येऊन केळी, माड, नारळ, झाडे खाण्यासाठी रात्रीच्या वेळी येत असल्याने गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, घराजवळ मिरचीचा धुर करुन खबरदारी घ्यावी. अशा सुचना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्या आहेत. तालुक्यात सध्या काजू, फणस यासारख्या फळांचा काढणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी काजू फळे घराजवळ साठवणूक करू नये. काजु फळामध्ये गोडवा व अल्कोहोल युक्त घटक असल्याने हत्ती त्यांच्या वासाने घराजवळ येऊ शकतो. हत्ती दिसून आल्यास त्याला दगड, काठी मारुन डिवचु नये असे आवाहन चंदगडचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

No comments:

Post a Comment