कोवाड येथे बाजारपेठेतील लॉकडाउनला धक्का, बाहेरगावाहून येणाऱ्यांना आवर घालण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2020

कोवाड येथे बाजारपेठेतील लॉकडाउनला धक्का, बाहेरगावाहून येणाऱ्यांना आवर घालण्याची गरज

कोवाड / प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोवाड परिसरातील गावानी लॉकडाउन काळात आपापल्या गावांच्या सीमा बंद करून गावात कडकडीत संचारबंदीचे पालन केले आहे. बाहेरून येणाऱ्याची गावात तपासणी केली जात आहे. पण आपली गावे कडकडीत बंद असल्याने परिसरातील अनेक लोक कोवाड बाजारपेठेत वेगवेगळ्या कारणाने गर्दी करत आहेत. दररोज परिसरातील लोक तोंडाला मास्क नसतानाही बाजारपेठेत येत आहेत. बाजारपेठेत खुलेआम प्रवेश करणाऱ्यांच्यावर प्रशासन वचक ठेवणार का, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. यामुळे बाजारपेठेतील लॉकडाउनला धक्का बसला आहे.
कोवाड हे बाजारपेठेचे गाव असल्याने ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याची गरज आहे . जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असताना येथे मात्र गेल्या आठ दिवसापासून बाजारपेठेत सकाळ व संध्याकाळच्या सत्रात लोकांची गर्दी होत आहे . परिसरातील गावांतून अनेक लोक येथे वेगवेगळ्या कारणासाठी मोठ्या संख्येने येत आहेत . यांच्यावर वचक नसल्याने फेरफटका मारणान्यांची संख्याही वाढली आहे . बाजारपेठेत खुलेआम होणाऱ्या प्रवेशामुळे येथील लॉकडाउनला धक्का बसला आहे . स्थानिक लोकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण फार कमी असले तरी अन्य लोकांच्यामुळे येथील लॉकडाउन चर्चेत आले आहे . परिसरातील जवळपास वीस गावांचा येथील बाजारपेठेशी संपर्क येतो . त्यामुळे प्रशासनाने येथे पोलिस बंदोबस्त वाढवन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याची गरज आहे . मालवाहू गाड्यांची संख्याही वाढली आहे . त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या लोकांची गावात येण्यापूर्वी चौकशी होण्याची गरज आहे . शेजारच्या कुदनूर , कालकुंद्री गावात बाहेर जाणाऱ्या व येणाऱ्यांच्या हाताला सॅनेटायझर लावले जात आहे . खबरदारी म्हणून दक्षता समितीमार्फत बंदोबस्त वाढविला आहे . बाहेरुन आलेल्या लोकांची स्वतंत्र इमारतीमधून वारंटाईन केले आहे . कोवाड येथे ९० लोक बाहेरून आले आहेत . त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज होती . पण होम कारंटाईनकडे येथे दुर्लक्ष झाल्याचे दिसते . कोवाड येथे पोलिस चौकी असूनही घराबाहेर पडणाऱ्यांच्यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे . सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होत नसल्याने अजूनही येथे कोरोनाचे गांभिर्य दिसत नसल्याचे चित्र आहे . तसेच बाजारपेठेत बाहेरुन येणाऱ्या लोकांच्यामुळेच अनेक अफवा पसरत आहेत . त्यासाठी पोलिसाना यावर करडी नजर ठेवावी लागणार आहे . बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीला वेळीच रोखण्यासाठी ग्रामपंचायत , दक्षता समिती व प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.

कोवाड हे बाजारपेठेचे गाव असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी स्वतःहून खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्क वापरणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या शासनाच्या आवाहनाला सर्वानीच प्रतिसाद दिला पाहिजे. त्यासाठी स्थानिक पातळीवर लॉकडाउन कडकडीत होण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment