चंदगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा दणका, अनेकांची उडाली तारांबळ - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2020

चंदगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा दणका, अनेकांची उडाली तारांबळ

चंदगड तालुक्यातील माणगाव परिसरात पडलेला मुसळधार पाऊस.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात आज अवकाळी पावसाने जोरदार दणका दिला. तालुक्याच्या पूर्व भागाला माणगाव, डुक्करवाडी, ढोलगरवाडी, मांडेदूर्ग, मलतवाडी, कोवाड, किणी,कडलगे, कारवे,शिनोळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. तर पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.आज दुपारी  दोन वाजल्यापासून  ढगाळ वातावरणामुळे उष्मा जाणवत होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास   सुसाट्याच्या वाऱा व गारासह पावसाला सुरवात झाली.
                                                व्हिडीओ - वादळी वाऱ्यासह पाऊस कोठे झाला पहा?

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शिवारात पाणी साठले आहे. त्यामुळे ऊसाला पाणी पाजवण्यासाठी शेतकऱ्यांना चार दिवस विश्रांती मिळाली आहे. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतातील मका भुईसपाट झाला आहे.अचानक झालेल्या पावसामुळे बहुतःश गावातील गटारे तुंबल्याने गावात दलदल झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत होते. हा पाऊस ऊस, काजू व भुईमूगाला लाभदायक ठरला असून उन्हाळी कंपनीला आलेल्या भात पिकाला नुकसानीचा ठरला आहे. वादळी वाऱ्यामुळे सुमारे चार तास विजपुरवठा खंडीत झाला होता. सुदैवाने कोठेही जिवीतहानी झाली होती. 
कोवाड परिसरात पडलेला अवकाळी पाऊस. 
                                          कोवाड - कर्यात भागात पावसाची हजेरी
आज दुपारी तीन वाजल्यानंतर कोवाड सह कर्यात भागात अचानक वळीव पावसाने हजेरी लावली.काल पासूनच वातावरण ढगाळ जाणवत होते.अशा परिस्थितीत आज 3 पासून 5 वाजेपर्यंत पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. त्यामुळे अवेळी झालेल्या या वळीव पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. कोवाड, कागणी, होसुर, किणी, नागरदळे, कडलगे, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, कार्वे, सुंडी, करेकुंडी, महिपाळगड, शिनोळी, निट्टूर, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, शिवणगे, मलतवाडी, लकीकट्टे, माणगाव, तांबुळवाडी, डुक्करवाडी, हलकर्णी, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी आदी भागात आज पावसाने तब्बल दोन तास  हजेरी लावली.  त्यामुळे हवेमध्ये कमालीचा गारठा जाणवत आहे. ऊस शेतीसाठी पाऊस गरजेचा असला तरीही कर्यात भागातील अनेक शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजी भिजल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन सर्दी खोकला यासारखे आजार होण्याची संभावना असते. अशावेळी आपल्या घरातील लहान मुलांनी पावसामध्ये न भिजता घरामध्येच सुरक्षित रहावे. कारण सर्दी खोकला सारखा आजार होऊन सर्वांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण होते, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले यांनी केले आहे.
तुर्केवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.
                                                   तुर्केवाडी परिसरात पावसाची हजेरी
तुर्केवाडी परिसरात शुक्रवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार वारा, ढगांचा कडकडाट, विजांसह पावसाने अचानक हजेरी लावल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे पावसाचा अंदाज बांधला जात होता. त्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण झाल्याने पावसाची दाट शक्यता होती. जवळपास तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पावसाने काजू उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दिलासा दिला आहे. काजूचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट कधी सुरू होणार? आणि काजू उत्पादनाला चांगले दिवस कधी येणार हा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
                                        

No comments:

Post a Comment