गव्याच्या मृत्यूप्रकरणी नागवे येथील दोन शेतकऱ्यांना १ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2020

गव्याच्या मृत्यूप्रकरणी नागवे येथील दोन शेतकऱ्यांना १ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

नागवे (ता. चंदगड) येथे गव्याचा मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी सोबत वनक्षेत्रपाल डी.जी.राक्षे,वनपाल दयानंद पाटील, ए. डी. वाजे आदी.
चंदगड / प्रतिनिधी
ऊस पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी लावलेल्या विद्युत भारीत बॅटरीच्या करंटाने गव्याचा मृत्यू झाला. नागवे पैकी नावळेवाडी येथे हि घटना घडली. याप्रकरणी  नागवे (ता. चंदगड) येथील  संतोष शिवाजी नावळे (वय -३६) व  तानाजी गणपती हवालदार (वय- ५५ )  या दोन संशयित शेतकऱ्यांना वनविभागाने अटक केली आहे. त्यांना चंदगड येथील न्यायालयात हजर केले असता  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. गायकवाड यांनी या दोन शेतकर्याना १ मे 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
या बाबत अधिक माहिती अशी कि – शुक्रवारी १७ एप्रिल 2020 रोजी वनविभागाचे फिरते पथक नागवे पैकी नावळेवाडी येथे गस्त  घालत असताना गट नं. 320 मधील हद्दीतील शेतात असलेल्या विहिरीतुन जंगली प्राणी कुजल्याचा तीव्र दुर्गंधी आल्याने गस्ती पथकाने उतरून पाहणी केली असता गट नं. ३२४ मधील ऊसाच्या सभोवताली तारेचे कुंपन मारलेले आढळून आले.   
गट नं 320 मधील याच विहीरीत गव्याला टाकून त्यावर पिजंर (गवत) टाकणेत आले होते.
याच कुंपनात बॅटरी मधून विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. त्यामुळे याच कुंपनात अडकून गव्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने संशयित संतोष नावळे व तानाजी हवालदार या दोन शेतकऱ्यांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. शेताभोवती तारेचे कुंपन करून त्यामध्ये बॅटरीद्वारे विद्यू्त  करंट सोडण्यात आला होता. या तारेमध्येच गवा अडकून त्याचा मृत्यू झाला. हि घटना १० एप्रिल 2020 रोजी घडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शेजारी पडक्या विहीरीत गव्याला टाकून त्यावर गवत (पिजंर) टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सदर गुन्हयाचा तपास कोल्हापूरचे  उपवनसंरक्षक कोल्हापुर एच. जी. धुमाळ, सहाय्यक वनसंरक्षक (खा. कु.तो व वन्यजीव) संदेश पाटील यांचे मार्गदशनाखाली वनक्षेत्रपाल   डी. जी. राक्षे, वनपाल  डी. जी. पाटील, बी. आर. निकम, ए. डी. वाजे, वनरक्षक श्रीमती ए. एस. घोरपड, के. आर. सानप,  एस. एस. होगले, वनमजुर  गुंडू देवळी, नितीन नाईक यांनी केला.

सदर गुन्हातील संशयित दोघांच्यावर  वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत चे कलम २ (१६), ९, ३९, ५०, ५१ अंतर्गत वनगुन्हा नोंद करणेत येऊन संशयितांना अटक करणेत आली. गवा हा वन्यप्राणी Gaur or Indian Bison शास्त्रीय नाव Bos gaurus  हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत Schedule - 1 अंतर्गत Part - 1 मधील असल्याने वन्यजीव (संरक्षण) कायद्या अंतर्गत ३ ते ७ वर्षा पर्यंतची शिक्षेची तरतुद आहे.

No comments:

Post a Comment