मजरे कार्वे येथील हनुमान जयंती उत्‍सव रद्द, ग्राम समिती व हनुमान उत्सव मंडळ यांचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2020

मजरे कार्वे येथील हनुमान जयंती उत्‍सव रद्द, ग्राम समिती व हनुमान उत्सव मंडळ यांचा निर्णय

हनुमान मंदिरातील मुर्ती.
मजरे कार्वे /  प्रतिनिधी
मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे होणारा हनुमान जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना विषाणूची दहशत तशीच आहे. या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी ग्राम समिती व व हनुमान उत्सव मंडळ यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
मजरे कार्वे गावामध्ये सोमवार दिनांक सहा एप्रिल ते बुधवार दिनांक आठ एप्रिल अखेर संपूर्ण गावात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यावेळी गावातील सर्व दुकाने पेट्रोल पंप, दूध संस्था, विकास सेवा संस्था, भाजीपाला दुकाने, यासह सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शेतकरी शेतातील कामे सुद्धा तीन दिवस बंद ठेवणार आहेत. सालाबाद प्रमाणे होणारा हनुमान जयंती उत्सव यानिमित्ताने रद्द करण्यात आला आहे. सोमवारपासून या हनुमान जयंती उत्सवानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचन, किर्तन, सोंगी भजन, काकड आरती, हरिपाठ यासह या उत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला महाप्रसाद ही यावेळी रद्द करण्यात आला आहे. हनुमान जयंती दिवशी पहाटे सहा वाजता हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो. मात्र यावर्षी हे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले असून भाविकांनी हनुमान जयंती दिवशी आपल्या आपल्या घरात पूजाअर्चा करावी. व घरातूनच भक्तीभावाने हनुमान चरणी नतमस्तक व्हावे असे आवाहन ग्राम समिती  व हनुमान जयंती उत्सव मंडळाने केले आहे.

No comments:

Post a Comment