लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील अनेक घरे दिवसभर बंद, शेतीकामे उरकण्याला होतेय मदत - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2020

लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील अनेक घरे दिवसभर बंद, शेतीकामे उरकण्याला होतेय मदत


कोवाड / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात ग्रामीण भागातील लोकांची पाऊले आता शेताकडे वळू लागली आहेत. घरातून बाहेर पडू नका,असे आवाहन प्रशासनाकडून केले जात असले तरी ग्रामीण भागातील लोक आपल्या शेतातील  झाडांच्या सावलीखाली दिवसभर  थांबून लॉकडाउनला प्रतिसाद देत आहेत. एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी शेतांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने ग्रामीण भागातील अनेक घरं दिवसभर कुलूप बंद होत आहेत.
राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. कोरोनचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाकडून नागरीकाना घरी थांबण्याचे आव्हान केले जात आहे. परंतूं अजूनही विनाकारण बाहेर करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, अशा लोकांच्यावर प्रशासनाने वचक ठेवला आहे. बुधवारी कोल्हापुरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यांनी पुन्हा मास्क न घालता घराबाहेर पडणाऱ्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.  कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच शासकीय  स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर अन्य सेवा बंद केल्या आहेत. नागरिकाना घराबाहेर पडू नका असे आवाहन केले जात आहे. 
बाहेरुन आलेल्या लोकाना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून ग्रामीण भागातील नागरीकानी आपापल्या गावच्या सीमाही सील केल्या आहेत. मात्र शेती कामाना स्थानिक पातळीवर सवलत दिली जात असल्याने ग्रामीण भागातील लोक आता सहकुटुंब आपल्या  शेताकडे वळू लागली आहेत . दिवसभर झाडाच्या सावलीत विसावा घेत आहेत. मुलांचे खेळ ही झाडांच्या सावलीत रंगू लागले आहेत. शेतात थांबणाऱ्या लोकांच्याकडून  तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे मात्र काटेकोर पालन केले जात आहेत. शेतातील छोट्या मोठया कामांसह जेवनाचाही आस्वाद घेतला जात आहे. यामुळे ग्रामीण गावांतील  गावातून लोकांची वर्दळ कमी होत आहे. या काळात  सुरक्षित वेळ घालविण्यासाठी अनेकानी हा मार्ग स्विकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक घराना दिवसभर कुलूप असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment