पेसाठीची कला नामशेष होण्याच्या मार्गावर, शिप्पूरच्या अभियंत्याने बनवली उत्कृष्ठ पेसाठी - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2020

पेसाठीची कला नामशेष होण्याच्या मार्गावर, शिप्पूरच्या अभियंत्याने बनवली उत्कृष्ठ पेसाठी

शिप्पूर येथील अभियंता रामचंद्र साटपे पेसाठीला हेगड घेत आहेत.  याचे निरीक्षण मुलगा मयूर.
तेऊरवाडी (एस. के. पाटील)
       विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात शेतकरी वर्ग ट्रॅक्टर सारख्या यंत्रांचा वापर करून आधुनिक शेती करण्याच्या  मागे लागला आहे. पण या सर्वामध्ये शेतकऱ्यांसाठी मौल्यवान असणारी पेसाठी मात्र नामशेष होण्याचा मार्गावर आहे . मात्र कोरोना लॉक डाऊनच्या वेळेचा सदुपयोग करत शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील अभियंता रामचंद्र  गणपती साटपे यानी कसबदार शेतकऱ्यांनाही जमणार नाही अशी उत्कृष्ठ पेसाठी बनवून शेती क्षेत्रामध्येही ' हम भी किसीसे कम नही ' याचा प्रत्यय आणून दिला.
       आज कल अनेकाना पेसाठी म्हणजे काय ? हेच मूळात माहित नाही. चंदगड, गडहिंग्लज तालूक्यांच्या पूर्व भागात धूळवाफ भात पेरणी केली जाते .भात पेरणीनंतर पेरलेले भात झाकण्यासाठी त्यावर पेसाठी फिरवली जाते . त्याचबरोबर भाताची उगवण होत असताना त्यावर असलेली मातीची डवळी फोडण्यासाठी पेसाठी फिरवली जाते . त्याबरोबरच पेरलेल्या पेरणीवर दडपण म्हणूनही पेसाठी फिरवली जाते . कोळपा ओढल्यानंतर मुजलेले भात उघडव्यासाठी पेसाठी फिरवतात.
      शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी अशी हि पेसाठी कणकिच्या ( मेस ) अगर  पूईच्या सरळ काठ्यापासून बनवली जाते. याची रुंदी कमित कमी सात वित तर जास्तीत जास्त नऊ वित असते .. यासाठी ८० ते ९० काठ्यांचा वापर केला जातो .पेसाठीच्या मजबूती करणासाठी मध्ये हेगड घेऊन प्रत्येक काठी बांधली जाते . शेवटी पेसाठी तयार झाल्यानंतर दोन्ही कोपऱ्यात दोरीची टोके बांधून मध्यभाग डोकीवर ठेवून पेसाठी ओढली जाते.
    यापूर्वी ४०० ते ५०० रुपये देवून पेसाठी विकत घ्यावी लागत होती . पण आता लॉक डाऊनच्या काळात वेळ मिळाला . नेहमी यंत्र हाताळण्याची सवय होती तीच सवय या काठ्या हाताळण्यासाठी  वापरली . बालपणच पेसाठी सोबत गेल्याने आता नवीन पेसाठी बनवताना त्याचा उपयोग  झाला असल्याची माहिती रामचंद्र साटपे यानी चंदगड लाईव्ह न्यूज प्रतिनिधींशी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment