चंदगड मतदारसंघात आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरू नये - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2020

चंदगड मतदारसंघात आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरू नये - आमदार राजेश पाटील

आमदार राजेश पाटील
तेऊरवाडी (प्रतीनिधी) 
      चंदगड तालुक्यातील पोलीस आणि आरोग्य यंत्रणा कायमच सतर्क आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी घाबरून जावू नये. मात्र आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे  आवाहन  चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले.
        आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी आमदार श्री. पाटील यांनी कोरोनाबाबत सविस्तर चर्चा केली असता तालुक्यातील जनतेशी बाधित व्यक्तींचा संपर्क आला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र अफवांचे पेव उठले आहे. या अफवावर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर कोणीही व्हायरल करू नये असे आवाहन केले. 
        तालुक्यात येत्या काही दिवसात सुमारे २५ हजार लोक पुणे, मुंबई तसेच बाहेरून येणार आहेत. त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पण त्यांना अलगिकरण कक्षात ठेवण्यासाठी ज्या-त्या गावांनी व्यवस्था करावी. मोठी आपत्ती आली असली तरी नागरिकांनी धैर्याने तोंड द्यावे, असे सांगताना पुणे-मुंबई येथून चंदगड तालुक्यात १८० जणांचे तर आज अखेर ३४७ जणांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले आहेत. तर २७  जणांचे  अहवाल  निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये अलबादेवी येथे कोरोनाची लागण झालेल्या युवकाचा समावेश आहे.  शासनाने पूणे, मुंबई येथील चाकरमान्यांना काही अटीवर गावी येण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त पूणे, मुंबई कोल्हापूर व इतर शहरात वास्तव्यास असणाऱ्या  चाकरमान्यांची सध्या गावा - गावात गर्दी होत आहे. आरोग्य विभाग, आशा व शिक्षक यांच्याकरवी गावचा सर्व्हे सूरू आहे. त्यानुसार बाहेरून येणाऱ्यांची चंदगड तहसिल कार्यालयात नोंद झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्यांची तपासणी केली जात आहे. चार दिवसात एकूण ३४७ चाकरमान्यांचे स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत. चाकरमान्यांचे गावी येण्याचे प्रमाण वाढत असून त्यांची आरोग्य तपासणी करण्याचा ताण आरोग्य कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने  या विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार श्री. पाटील यांनी केले. यावेळी तहसिलदार विनोद रणवरे, पो. नि. अशोक सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. के. खोत,  पं. स. गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, चंदगड नगराध्यक्षा प्राची काणेकर, प्रविण वाटंगी, अली मुल्ला आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment