तालुक्यातील कोरोना चेकनाके व क्वारंटाईन केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट, कामाबद्दल व्यक्त केले समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2020

तालुक्यातील कोरोना चेकनाके व क्वारंटाईन केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट, कामाबद्दल व्यक्त केले समाधान

कानुर खुर्द (ता. चंदगड) येथे क्वारंटाईन केंद्रावरील लोकांच्या समस्या जाणून घेताना जिल्हाधिकारी दौलत देसाई, सोबत प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसिलदार विनोद रणवरे आदी. 
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
          कोल्हापुरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी आज मंगळवार ९ रोजी सायंकाळी चंदगड तालुक्यातील कोरोना चेक नाके व क्वारंटाईन केंद्रांना अचानक भेट दिली. त्यांनी गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर व चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांच्यासह थेट आंबोली घाटातून बेळगाव कडे येणाऱ्या मार्गावरील चेक नाक्याला भेट दिली. कानूर खुर्द येथे येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन केलेल्या केंद्राला भेट दिली. येथे क्वारंटाईन केलेल्या पुणे, मुंबई व अन्य भागातून आलेल्या ग्रामस्थांनी शाळेची केली स्वच्छता व बाग-बगीचा, वृक्षारोपण पाहून प्रशंसोद्गार काढले. केंद्रावरील सध्या असलेल्या सुमारे बारा कुटुंबियांची कोविड-१९ संदर्भातील नियम पाळत असल्याबद्दल प्रशंसा केली. चेक नाक्यांवर अहोरात्र पहारा देत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. चंदगड तालुक्याला कर्नाटक, गोवा राज्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा हद्द लागते. तथापि अतिदुर्गम असूनही इथल्या प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आवर्जून सांगितले. आरोग्य विभागातील डॉक्टर, सर्व आरोग्य सेविका, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, शिक्षक, कोरोना दक्षता पथके व प्रशासनातील सर्व घटकांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment