चंदगड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तक वितरण तयारी पूर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2020

चंदगड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तक वितरण तयारी पूर्ण

कोवाड येथे विविध केंद्रातून आलेल्या केंद्र मुख्याध्यापक व शिक्षकांना पाठ्यपुस्तके वितरण करत असताना केंद्रप्रमुख व बीआरसी टीम. 
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
          महाराष्ट्र शासन व बालभारतीच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत. या योजनेअंतर्गत चंदगड पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत वितरणाची तयारी पूर्ण केली असून १५ जून रोजी पुस्तके मुलांच्या हाती पडतील यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सौ. एस एस सुभेदार यांनी दिली.
          कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वितरित करण्यात आलेली पाठ्यपुस्तके कोवाड  येथील श्रीराम विद्यालय व श्रीमान व्ही पी देसाई ज्युनिअर कॉलेज येथे आठ दिवसांपूर्वी पोहोचली. त्यांची इयत्ता व केंद्रनिहाय विभागणी  पूर्ण झाली असून शनिवार दिनांक १३ जून अखेर तालुक्यातील सर्व एकोणीस केंद्रात पुस्तकांचे संच पोहोचतील. तालुक्याला प्राप्त झालेल्या पुस्तकांची इयत्ता निहाय संच संख्या अशी आहे; इयत्ता पहिली 1944, दुसरी 2055, इयत्ता तिसरी 2025,  इयत्ता चौथी 2154,  इयत्ता पाचवी 2230,  इयत्ता सहावी 2171, इयत्ता सातवी 2165, इयत्ता आठवी 2200. हे संच ज्या त्या केंद्रात पोहोच करण्यात आले आहेत.
        पुस्तके वितरण कामी विभाग प्रमुख डी आय पाटील (केंद्रप्रमुख कुदनुर), वाय आर निटुरकर (केंद्रप्रमुख कालकुंद्री व कोवाड) गट समन्वयक सुनील पाटील, बी आर सी विषयतज्ञ महादेव नाईक,  भाऊ देसाई, तानाजी पाटील, स्वाती चौगुले आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य हे ए एस पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment