बाळाने धरले नाग सापाला, अन् त्या दोघांच्याही ह्रदयाचा ठोका चुकला, बेळगाव परिसरातील व्हीडीओ होतोय व्हायरल - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2020

बाळाने धरले नाग सापाला, अन् त्या दोघांच्याही ह्रदयाचा ठोका चुकला, बेळगाव परिसरातील व्हीडीओ होतोय व्हायरल

नाग सापाला धरत असलेला चिमुकला.
एस. के. पाटील - तेऊरवाडी सी. एल. वृत्तसेवा
         सध्या कर्नाटक - महाराष्ट्र सिमा भागात पेरणीचा जोरदार हंगाम चालू आहे . सर्व शेतकरी आपल्या लहान मूला समवेत शेतीकामामध्ये गुंतले आहेत .अशातच सोबत असणारी लहान मुले केव्हा काय करतील ? याचा नेम नाही. अशा परिस्थितीत बेळगाव जवळील कंग्राळी बुद्रूक येथे वडीलासमवेत शेतात गेलेल्या लहान मुलाने अनावधनाने चक्क नागराजाच्या शेपटीलाच धरल्याने भला मोठा नागराज फना काढून उभा राहिला .सुदैवाने या घटनेत कोणताही अनर्थ घडला नसला तरी या घटनेने त्या दोघांच्याही हदयाचा ठोका तर चूकलाच पण हा व्हायरल व्हीडीओ बघणाऱ्यांच्या ह्रदयाची स्पंदने काही क्षण तरी थांबलाशीवाय रहात नाहीत .
        बेळगाव पासून अगदी सहा किमी  अंतरावर असणाऱ्या कंग्राळी बुद्रुक येथील वडील व लहान मुलगा शेताकडे गेले होते . शेताकडे जायला मिळाल्याने तो लहान मुलगा आनंदित होऊन खेळायला लागला लॉक डाऊनमध्ये घरीच राहून कंटाळलेल्या त्या मूलाला बाहेरच्या शेतात खेळायला मिळाल्याने तो खेळण्यामध्ये गुंतून गेला . शेतातील काम संपल्यानंतर त्या वडिलानी मुलाला घरी जाण्यासाठी हाक मारली. पण खेळण्यामध्ये रममान झालेल्या त्या चिमुकल्याने वडिलांच्या हाकेकडे दुर्लक्ष केले. शेवटी कंटाळलेल्या वाडिलांनी त्या चिमुकल्याचा व्हीडिओ करत घरी जाण्यासाठी हाका मारायला सुरवात केली. तो चिमुकला बागडत -बागडत वडिलाकडे येऊ लागला . वडिलांचे सर्व लक्ष मोबाईलमध्ये व्हीडिओ करण्यामध्ये होते. चिमुकला चालत चालत पुढे येत असताना अचानक त्याला चमकणारी वस्तू दिसली . लगेच त्या चिमुकल्याने टोकाकडील बाजूने ती वस्तू उचलली . क्षणात त्या वस्तूची हालचाल झाली अन अंदाजे सहा फूट लांबीचा भला मोठा नाग फणा काढून उभा राहिला . अचानक घडलेल्या या घटनेने तो चिमुकला आणि व्हीडीओ करण्यामध्ये दंग असणाऱ्या वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला . सापाला  बालकाने पुढून पकडले असते तर . जर त्या नागाने बालकाला दंश केला असता तर ..  मोठा अनर्थ घडला असता . एक क्षणही न दवडता ते दोघे बाप लेक एकमेकांकडे धावत गेले . वडीलांनी घाबरलेल्या छोट्या चिमुकल्याला कडेवर उचलून घेतले . फना काढून उभा राहिलेला तो नाग शांतपणे तसाच पुढे निघून गेला . कदाचित विषारी नागालाही बालकाच्या खोडकरपनाची दया आली असणार .आपल्या चूकीमूळे बाळाचा जीव धोक्यात घातला असल्याच्या भावनेने वडीलांचा जीव कासाविस झाला . पण दोघांच्याही सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने याची जोरदार चर्चा चंदगड तालूक्यात चालू आहे.

                                            पालकांनी दक्ष रहावे
      सध्या या परिसरात पेरणाचा हंगाम चालू आहे . याच काळात मोठ्या प्रमाणात श्वापदे बाहेर पडतात . लहान मुले शेतात अगर घराशेजारी बागडताना, खेळताना लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा एखादया अप्रिय घटनेला सामोरे जावे लागेल.

No comments:

Post a Comment