स्वत:ची काळजी स्वत: घ्या, घाबरु नका, नियमांचे पालन करा, अडीच महिन्याच्या बालकासह कोरोनामुक्त झालेल्या आई-वडीलांचा संदेश - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

स्वत:ची काळजी स्वत: घ्या, घाबरु नका, नियमांचे पालन करा, अडीच महिन्याच्या बालकासह कोरोनामुक्त झालेल्या आई-वडीलांचा संदेश

कोल्हापूर / प्रतिनिधी
          कोरोनाची भिती बाळगू नये, परंतु स्वत:सह इतरांची काळजी घ्या. त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा, असा संदेश एकलव्य कोरोना काळजी केंद्र, पन्हाळा येथून अडीच महिन्याच्या आपल्या बालकासह आज कोरोनामुक्त झालेल्या आई-वडीलांनी देतानाच केंद्रात चांगल्या सुविधा दिल्याबाबत आवर्जुन सांगितले. या केंद्रातून आज मुक्त झालेल्या 9 जणांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.*
  पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील 35 वर्षाचा युवक गुजरात येथील सुरत येथे कामानिमित्त गेले होते. तेथेच त्यांच्या बालकाचा जन्म झाला. दिनांक 16 जुलै रोजी ते सुरतहून आपली 27 वर्षाची पत्नी आणि 70 वर्षाच्या सासूसह जिल्ह्यामध्ये आले. किणी तपासणी नाक्यावरुन त्यांना पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य कोव्हिड काळजी केंद्रात पाठवण्यात आले. दिनांक 17 जुलै रोजी या चौघांचा स्वॅब घेण्यात आला. 18 जुलै रोजी त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आला. तेंव्हापासून या चौघांना या केंद्रामध्ये ठेवण्यात आले. 
  आई म्हणून सुरुवातीला बाळाची खूप काळजी वाटत होती. थोडी भीतीही वाटत होती. परंतु नंतर पतीने धीर दिला आणि भीती लोप पावली, अशी प्रतिक्रिया बाळाच्या आईने दिली. तर अजिबात भीती बाळगू नका. परंतु, काळजी मात्र घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बाळाच्या वडीलांनी दिली. या केंद्रामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी तपासणी केली जात होती. सकाळी चहा, नाश्ता, दुपारी जेवण आणि रात्री जेवण अशी चांगली सोय करण्यात आली आहे. चांगला नाश्ता आणि चांगले जेवण दिले, असे सांगून सतत हात धुणे, मास्क वापरुन कोरोनाची दक्षता घ्यावी. परंतु घाबरुन जावू नये, असेही बाळाच्या वडीलांनी सांगितले.
  प्रोटोकॉल नुसार केंद्रातील बाधितांवर उपचार करण्यात आले. या केंद्रातून आज एकूण 9 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज कार्ड देवून टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनंदा गायकवाड यांनी सांगितले. डॉ. गायकवाड आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जावेद कच्छी, डॉ. स्वानंद मिरजकर, डॉ. अरविंद शिनोळकर, डॉ. सुप्रिया ढोले, पर्यवेक्षक गोपाळ पाटील, परिचारिका रुपाली पाटील, अरुणा मांगले आदींच्या पथकाने या केंद्रातील बाधितांवर उपचार केले.

     

No comments:

Post a Comment