सापांविषयी माहिती देणाराी मालिका भाग -१ , सापाचे नाव - नाग (कोब्रा) - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2020

सापांविषयी माहिती देणाराी मालिका भाग -१ , सापाचे नाव - नाग (कोब्रा)

                                                    नाग (कोब्रा-cobra)
          चंदगड लाईव्ह (सी. एल. न्यूज)  न्युज चॅनेलच्या वाचकांसाठी आज पासून विविध विषारी व बिनविषारी सापांची माहिती देणारी मालिका सुरू करत आहोत. या मालिकेतील पहिला साप आहे आपला सर्वपरिचित. नाग (कोब्रा-cobra).
नाग (कोब्रा-cobra)
नाग सापाची माहीती - 
           नाग (कोब्रा-cobra) नाग हा भारतात सर्वत्र आढळणारा विषारी साप आहे. याचा रंग पिवळसर, गहू वर्ण, पांढरा, तपकिरी, काळा किंवा करड्या रंगाचा असतो. (त्याचे वास्तव्य असलेल्या परिसरातील मातीच्या रंगाप्रमाणे याच्याही रंगात बदल होत असतो). याचे डोके आकाराने चौकोनी बारीक असते. नागाची लांबी दिड ते सव्वादोन मीटर पर्यंत असते. आक्रमण करताना तो फणा काढून आवाज करत चावा घेतो.  नाग अंडी घालतो त्यातून पिल्ले बाहेर पडे पर्यंत त्यांचे रक्षण करतो. निर्जन प्रदेशात इतर प्राण्यांनी सोडून दिलेल्या बिळात किंवा मुंग्यांनी सोडून दिलेल्या वारुळात वास्तव्य करतो.  नागाच्या फण्याच्या मागील बाजूस इंग्रजी व्ही आकाराची खूण (१० चा आकडा) व गळ्याकडील बाजूस दोन किंवा तीन काळे पट्टे असतात.  शेतातील उंदरांचा फडशा पाडून तो पिकांचे संरक्षण करतो. बेडूक, छोटे पक्षी, कीटक, सरडे हेसुद्धा नागाचे भक्ष्य आहे.  मुंगूस, गरुड, कोल्हे, मोर हे नागाचे शत्रू आहेत. अनेक गैरसमजातून माणूस नागाची हत्या करतो.  सर्पदंशानंतर नागाचे विष माणसाच्या मज्जा संस्थांवर परिणाम करते. सर्पदंश झाल्यास अधिक हालचाल न करता रुग्णास दवाखान्यात हलवावे. उपचार होईपर्यंत दंश झालेल्या जागेपासून हृदयाकडील बाजूला आवळपट्टी बांधून ती थोड्या थोड्या वेळाने सैल करून पुन्हा बांधत राहावे.  सापाला ऐकायला कान नाहीत. मात्र जमीनीचे व्हायब्रेशन त्याला तात्काळ समजते. साप पुंगीवर डोलत नाही गारूड्याच्या हालचालीवर हलतो. साप डुख धरत नाही त्याची स्मरणशक्ती अतिशय कमी असते. सापाला केस नसतात. नाग दूध पीत नाही. तो पूर्णतः मांसाहारी असून भक्ष्याला पकडून गिळतो.नाग सर्पदंश झाल्यास कोणत्याही मंत्रा तंत्रावर जडीबुट्टीवर अजिबात अवलंबू न राहू नका त्याच्यावरतीअॅन्टी स्नेक व्हेनम हाच खात्रीशीर इलाज आहे. नागाचे विष निरो टॉकझीक गटात मोडते. तर व्हायपर जातीच्या सापाचे विष हिमोटॉकझीक गटात येते.

        आज चित्रपट, पुराणकथा,  मांत्रिक, मिडीया यांनी या सापाबद्दल चुकीची माहिती पसरवलेली आहे. नागपंचमीचा नायकच आज खलनायक बनला आहे. शास्त्रीय माहितीच्या आधारे हे बदलणे गरजेचे आहे.

       संकलन व लेखन :- श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड जि. कोल्हापूर) मोबाईल नंबर - 9423270222

     सहकार्य :- सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील (सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी), तानाजी वाघमारे (उपाध्यक्ष- शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी), भरत दत्तात्रय पाटील (सेवानिवृत्त डीएफओ- कोल्हापूर)


No comments:

Post a Comment