सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १७ (बिनविषारी साप) नायकुळ/धुळनागीन Banded Racer (Argyrogena fasciolata) - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १७ (बिनविषारी साप) नायकुळ/धुळनागीन Banded Racer (Argyrogena fasciolata)

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १७ (बिनविषारी साप) नायकुळ/धुळनागीन
नायकुळ/ धूळ नागीन Banded Racer (Argyrogena fasciolata)

नायकुळ  किंवा धूळनागीन हा बिनविषारी साप आहे. याला इंग्लिश मध्ये Banded Racer असेही म्हणतात. याला दक्षिण कोकणात नायकुळ, विदर्भात धूळनागीन, मराठवाड्यात गाव्हाल्या, गोव्यात नागिन तर गडचिरोलीत ताडजेरी अशा  विविध नावांनी ओळखले जाते.  पश्चिम महाराष्ट्रात क्वचित आढळणारा धूळनागिन हा बिनविषारी साप विशेषतः मध्य आणि दक्षिण भारतात आढळतो.
 याची सरासरी लांबी एक ते दीड मीटर पर्यंत असते. रंग  फिकट किंवा गडद तपकिरी,  शरीर लांब, निमुळते टोकदार डोके, शेपूटही लांब व निमुळती असते. दिसण्यात नाग सापाशी साधर्म्य असल्यामुळे याला धूळनागिन म्हटले जात असावे. याच प्रजातीतील सापाला तोंडापासून शेपटीपर्यंत लांब पट्टे असतात त्याला पट्टेरी धूळ नागिन म्हटले जाते.
या सापाची मादी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान ५-६ अंडी घालते. पिल्लांच्या अंगावर ठराविक अंतरावर पांढरे पट्टे असतात, नंतर ते जातात.
धूळ नागिन चे प्रमुख खाद्य उंदीर असल्यामुळे धामण प्रमाणे हा साप सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकांचा रक्षणकर्ता म्हणायला हवा. भक्ष पकडल्यानंतर गिळण्यापूर्वी त्याला आवळून ठेवतो.
याचे वास्तव्य गवतात, झुडूपात, उंदरांच्या बिळात किंवा दगडांमध्ये असते. हा साप दिनचर म्हणजे दिवसा फिरणारा असून डिवचले गेल्यास मानेचा भाग फुगवतो त्यामुळे काहीसा नागासारखा दिसत असल्यामुळे याला विषारी नागच समजून माणसाकडून हत्या होण्याची शक्यता अधिक आहे.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  


सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


*शब्दांकन/संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२


No comments:

Post a Comment