![]() |
| साडेतीनशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच मार्चमध्ये कोरडा पडलेला पारगड किल्ल्यावरील गुंजन तलाव |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील पारगड किल्ल्यावर असणाऱ्या तीन तलावांपैकी कधीच न आटणारा गेल्या साडेतीनशे वर्षांपासून गडावरील मावळ्यांची तहान भागवणारा 'गुंजन' तलाव यंदा इतिहासात पहिल्यांदा मार्च महिन्यातच कोरडा ठाक पडला आहे. परिणामी गडावरील पाणी प्रश्नाने पुन्हा एकदा गंभीर रूप धारण केले आहे. दुसरीकडे पाच वर्षे सुरू असलेली नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. गडावर पाणी यायचे असेल तर प्रशासन, ठेकेदार व लोकप्रतिनिधींना पाझर फुटण्याची गरज व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्यात तरी गडावर पाणी येणार का? असा सवाल गडावरील नागरिक करत आहेत.
सन १६७४ म्हणजे तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवा व दक्षिण मोहिमेवर असताना पारगड किल्ल्याची निर्मिती केली. गडावर पाण्याच्या मुबलक उपलब्धतेसाठी गुंजन, गणेश, महादेव आणि फाटक असे चार तलाव आणि १८ विहिरी बांधल्या. यापैकी केवळ चार-पाच विहिरी सध्या वापरात आहेत. या विहिरी किल्ल्याच्या विविध भागात असल्या तरी सर्वच तलाव गडाच्या कड्यापासून केवळ १० ते २० फुट अंतरावर आहेत. तरीही त्यांतील एक थेंबही पाणी पाझरून बाहेर जात नाही हे या तलावांचे वैशिष्ट्य आहे. पैकी महादेव तलाव वापरात नसून इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. उर्वरित तीनपैकी पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जाणारा व कधीही न आटणारा गुंजन तलाव यंदा मार्च महिन्यातच कोरडा पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर गेल्या १० वर्षांत एप्रिल महिन्यात सर्वच तलाव व विहिरी कोरड्या पडत असल्याने गडावरील नागरिकांना पावसाळ्यापर्यंत गाव सोडून अन्यत्र स्थलांतरीत होण्याची नामुष्की ओढवते. पाण्याअभावी ग्रामस्थ व किल्ल्यावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या प्रश्नासाठी पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी १ मार्च २०२३ रोजी चंदगड पंचायत समिती समोर आमरण उपोषण केले होते. तेव्हा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण विश्राम गावडे यांच्या उपस्थितीत ८८ लाख ५६ हजार रुपये मंजुरीचे पत्र व वर्क ऑर्डर दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. तथापि पुढील दोन वर्षे काहीच हालचाली न झाल्याने पुन्हा १ मार्च २०२५ रोजी शेलार यांनी उपोषणाचे अस्त्र उपसल्या नंतर काम रडत खडत सुरू झाले. पण कामात कोणतीच गती नसल्याने पारगड वासीयांची पाण्यासाठी परवड सुरूच राहीली आहे. या आधी सन २००२-३ च्या सुमारास तत्कालीन विधानसभा सभापती स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या माध्यमातून एक नळ पाणी योजना राबविण्यात आली होती. गडाखालून आणलेल्या या पाण्यावर विचित्र प्रकारचा तेलकट तवंग साठू लागल्याने. हे पाणी आणि योजनाही कूचकामी ठरली.
त्यानंतर पुन्हा पारगडच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले हे काम अनेक वेळा अर्ज, विनंत्या,आंदोलने करूनही अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. यंदा तरी संपूर्ण दुर्भिक्ष येण्यापूर्वी पाणी गडावर येईल का? याबाबत नागरिक व पर्यटक शंका व्यक्त करत असून नळांद्वारे घरपोच नसले तरी कोरड्या पडलेल्या तलावांमध्ये तरी पाणी आणून सोडा..! अशी आर्त मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
पाण्याअभावी दलित बांधव भोगताहेत मरण यातना
शिवकाळापासून येथील दलित वस्ती किल्ल्याच्या खाली पायऱ्यांलगत आहे. विशेष म्हणजे तेथील स्त्री- पुरुष गडाखाली पाणी नसल्याने पाणी नेण्यासाठी तीनशे पायऱ्या चढून गडावरून घागरीने किंवा प्लॅस्टिक कॅन पोत्यात घालून पाठीवरून पाणी खाली नेतात. साडेतीनशे वर्षे पाण्यासाठी यातना भोगणाऱ्या दलित बांधवांचे हाल विचारायलाच नको! 'मुकी बिचारी कुणी हाका' अशी यांची अवस्था आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment