आठ दिवसात कोवाड बाजार पेठ दुसऱ्यादा पाण्याखाली, नदीकाठच्या शेतीचेही मोठे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2020

आठ दिवसात कोवाड बाजार पेठ दुसऱ्यादा पाण्याखाली, नदीकाठच्या शेतीचेही मोठे नुकसान

पाण्यात अर्धी बुडालेली कोवाड बाजारपेठ                        जमीनदोस्त झालेले ऊस
कोवाड / सी एल वृत्तसेवा
      आश्लेषा नक्षत्राला सुरुवात झाल्यापासून पावसाने चंदगड तालुक्यात जोर धरला आहे.संथगतीने पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी सुखावले होते पण, गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढल्यामुळे कर्यात भागातील शेतकऱ्यांसह, कोवाड बाजारपेठेतील व्यावसायिक पुन्हा हादरले आहेत.
       गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी पूर आल्यामुळे कर्यात भागातील कोवाड बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले होते. पुर ओसरल्यानंतर बाजारपेठ सुरळीत चालू झाली पण पुन्हा पाऊस जोरदार पडत असल्याकारणाने येथील व्यापारी वर्गाला आपल्या दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे लागले.पुराने वेढा घातलेली संपूर्ण कर्यात भागातील नदीकाठची शेती सात - आठ दिवस पाण्याखाली होती त्यामुळे भात,नाचणी पिके कुजली आहेत व ऊसाचे सुद्धा नुकसान झाले आहे.
           त्यानंतर पूर ओसरल्याने लोकांना काही दिवस आशा वाटत होती की उघडीप पडून पिके सुधारतील. पण शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढल्याने ताम्रपर्णी नदी पुन्हा ओसंडून वाहत आहे व कोवाड येथील जुना पूल पाण्याखाली गेला असून नदीकाठची पिके हि पाण्याखाली गेल्यामुळे राहिलेली पिके हातची जाणार या भीतीने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कोवाड बाजारपेठेतील व्यापारी बंधूंची पुन्हा गाळण उडाली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी जोर धरत आहे.

No comments:

Post a Comment