![]() |
ढोलगरवाडी सर्प शाळेत सापाला सहजतेने हाताळणाऱ्या विद्यार्थिनी. |
प्रश्न :- नाग (किंवा कोणताही साप) साप केवड्याच्या बनात राहतो काय?
उत्तर :- याचे उत्तर होय म्हणावे लागेल! केवड्याचे बन हे काटेरी असते. केवड्याला येणारे सुगंधी कणीस उंदरांचे आवडते खाद्य आहे आणि उंदीर हा सापाचे आवडते खाद्य. त्यामुळे उंदराला पकडून खाण्यासाठी साप हा केवड्याच्या बनात फिरत असतो. दुसरे कारण म्हणजे केवड्याची बने काटेरी व गच्च असल्यामुळे सापाला लपून राहण्यासाठी ते ठिकाण उपयुक्त ठरते. त्यामुळे केवड्याच्या बनात सापाचे दर्शन शक्य आहे.
प्रश्न :- सर्पदंशाच्या ठिकाणी नागवेलीची मुळी उगाळून लावल्यास उलटीवाटे विष बाहेर पडते काय?
उत्तर :- नाही! विषारी सापांच्या दंशावर प्रतिविष- अॅंन्टी व्हेनिन (antivenin injection) शिवाय दुसरा काही उपाय नाही.
प्रश्न :- साप शीत रक्तीय (cold blooded) असतो, हे खरे आहे काय?
उत्तर :- होय! सापाच्या शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार कमी-जास्त होते (बदलते). म्हणून त्याला शीत रक्तीय तथा कोल्ड ब्लडेड (cold blooded) म्हटले जाते. तर मानव व सर्व सस्तन प्राण्यांमध्ये बाहेरचे तापमान कितीही कमी जास्त होत असले तरी त्यांच्या शरीराचे तापमान ठराविकच राहते. त्यामुळे सर्व सस्तन प्राणी वार्म ब्लडेड (warm blooded) असतात.
प्रश्न :- नदी-नाले ओलांडल्यामुळे सापाची विषबाधा वाढते काय?
उत्तर :- नाही! हा एक गैरसमज आहे. कितीही नदी-नाले ओलांडले तरी विषबाधेचे प्रमाण वाढण्याचा प्रश्नच येत नाही.
प्रश्न :- सर्पदंश झालेल्या व्यक्तीला स्त्रीने मदत केली तर चालेल काय?
उत्तर :- संकटकाळी कोणीही मदतीला आल्यास त्याचे स्वागतच असते. सर्पदंश झालेल्या व्यक्ती जवळ कोणतीही (मासिक पाळी आलेली स्त्री सुध्दा) स्त्री गेली किंवा तिच्या बांगड्या वाजल्या तर विषबाधा वाढते. असा एक गैरसमज आहे. तथापि त्यातही शास्त्रीय आधारावर काही तथ्य नाही. सर्पदंश झालेल्या कोणालाही कोणत्याही स्त्रीने जरूर बिनधास्त सहकार्य करावे. यात कोणताही धोका नाही. (सर्पदंश झालेल्या व्यक्ती जवळ स्त्री व्यक्तीरिक्त कोणीच नसेल तर त्याला मरणाच्या दारात ढकलायचे का?)
सौजन्य :- प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी व शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
आभार :- मा. तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक सर्पोद्यान ढोलगरवाडी.
सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर
*शब्दांकन* :- श्रीकांत वै. पाटील,* कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment