कोल्हापूर येथे पहिले मराठी साहित्य संमेलन २ नोव्हेंबर रोजी - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2025

कोल्हापूर येथे पहिले मराठी साहित्य संमेलन २ नोव्हेंबर रोजी


कोल्हापूर / सी. एल. वृत्तसेवा

        अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने “पहिलं कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन – २०२५” रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाचा निर्णय कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

        बैठकीत परिषदचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय साबळे यांनी संमेलन कोल्हापूर येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. चर्चेनंतर सर्वानुमते दिनांक २ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली.

        जिल्हाध्यक्ष संजय साबळे म्हणाले, “मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांना बळकटी देण्यासाठी आज साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे. या संमेलनात तीन सत्रांमधून विविध साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत. पहिले सत्र - उद्घाटन व संमेलनाध्यक्षांचे भाषण, दुसरे सत्र - कवी संमेलन, जे नवोदित कवींना एक पर्वणी ठरणार आहे, आणि तिसरे सत्र - ‘मनोरंजनातून प्रबोधन : महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने सजणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

    परिषदच्या महिला जिल्हाध्यक्षा मनिषा डांगे यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्यिक चळवळ उभी करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, संमेलनाचे ठिकाण कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे ‘विद्याभवन’ हे असेल.

        यावेळी अर्जुन हराडे सर यांनी आभार मानले. मराठी साहित्य, संस्कृती आणि कलांच्या संगमाने रंगणारं हे संमेलन मराठी रसिकांसाठी एक साहित्यिक पर्व ठरणार आहे.

No comments:

Post a Comment