सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ७ प्रश्नोत्तरे / शंकासमाधान - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ७ प्रश्नोत्तरे / शंकासमाधान

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेलच्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका  भाग : ७  प्रश्नोत्तरे / शंकासमाधान  
सापाचे संग्रहित छायाचित्र
वाचकांसाठी गेल्या सहा भागांमध्ये आपल्या देशात व परिसरात आढळणाऱ्या विषारी सापांविषयी माहिती देण्यात आली आहे. यानंतर देशात आढळणाऱ्या बिनविषारी सापांविषयी माहिती देण्यात येणार आहे. तत्पूर्वी  येत्या काही भागात वाचकांच्या आग्रहास्तव सापांविषयी त्यांच्या शंका-कुशंका, प्रश्न यांचे निरसन होण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नोत्तर स्वरुपात माहिती दिली जाणार आहे. वाचकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी सर्पमित्र प्रा.सदाशिव पाटील -7083306979 किंवा मालिका संपादक श्रीकांत पाटील-9423270222 यांचेकडे व्हाट्सअप द्वारा आपले प्रश्न पाठवू शकता. योग्य व समान प्रश्‍नांचे निरसन करण्याचा प्रयत्न या मालिकेत केला जाईल.
 शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सापांविषयी आज चित्रपट, दंतकथा, पुराणकथा,  मांत्रिक, पोटभरू गारुडी, सोशल मिडीया यांनी  बरीच चुकीची माहिती समाजात पसरवलेली आहे. पर्यावरण संतुलनातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या नाग व इतर सापांबाबत समाजात अनेक समज गैरसमज, अंधश्रद्धा आहेत. त्यांचे शास्त्रीय माहितीवर आधारित  उद्बोधन गरजेचे आहे. त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न.

प्रश्न :- साप दूध पितो म्हणतात, हे खरे आहे का?
 उत्तर :- नाही!  कोणताही साप हा १०० टक्के मांसाहारी आहे. त्यामुळे तो दूध पिण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच सापाची जीभ बारिक व दुभंगलेली (फाटे फुटलेली) असल्यामुळे त्याला गाय, म्हैस यांच्या स्तनातून दूध शोषून घेता येत नाही. पण काही लोक म्हणतात की मी साप स्तनातून दूध पिताना पाहिले आहे. हे प्रत्यक्षदर्शी बरोबर असले तरी साप हा त्यांचे दूध पिण्यासाठी स्तनाकडे गेलेला नसून गाय व म्हशी ची हलणारी स्तने एखादा उंदीर सारखा प्राणी असावा या समजुतीने तो पकडून खाण्याच्या उद्देशाने गाय किंवा म्हशीचे स्तन तोंडात पकडलेल्या अवस्थेत लोकांना दिसू शकतो.  दुसरीकडे काही महिला नागपंचमी किंवा इतर वेळी गारुडी जवळील सापाचे पूजन करताना त्याच्याजवळ दूध ठेवतात.  काहीवेळा ते दुध साप पितो. याचे शास्त्रीय कारण म्हणजे सापाला (किंवा कोणत्याही प्राण्याला) काही खाल्ल्यानंतर त्याचे पचन होण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते व पाणी न मिळाल्यास तो दूधच नव्हे तर दारू सारखा द्रवपदार्थ सुद्धा पिऊ शकतो. म्हणून साप दारू पितो म्हणणे कितपत योग्य आहे!  लोकांची दिशाभूल करण्यासाठी गारुडी लोक आपल्याकडील सापाला जाणीवपूर्वक अनेक दिवस तहानलेला ठेवत असतात. व तो तहान भागवण्यासाठी नाईलाजास्तव दूध पितो.

प्रश्न :- मंदिरांमध्ये देवाचा साप असतो हे खरे आहे का?
 उत्तर :- नाही! हा एक गैरसमज आहे. साप हा मुळात एकांतप्रिय प्राणी आहे. त्यामुळे गावाबाहेर असलेल्या सुनसान मंदिरांच्या ठिकाणी विशेषतः साप आढळतो. या मंदिरातून साप दिसण्याचे दुसरे कारण म्हणजे; बरेच भाविक मंदिरात गेल्यानंतर देवासमोर नैवेद्य ठेवतात. यात विविध पदार्थ असतात आणि हे पदार्थ तेथील देव काही खात नाही. भाविक मंदिरातून निघून गेल्यावर असे पदार्थ खाण्यासाठी तेथे उंदीर किंवा तत्सम प्राणी यांची वर्दळ असते. हे उंदीर सापांचे मुख्य खाद्य असल्यामुळें उंदरांची चाहूल लागताच जवळपासचे साप उंदराला पकडण्यासाठी मंदिरात जातात. हे साप प्रत्येक वेळी वेगवेगळे असू शकतात. या ठिकाणी दुसरे भाविक आल्यानंतर त्यांना हे साप दिसतात. तेव्हा त्यांना वाटते की हा देवाचा साप आहे.

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

संकलन व लेखन :- श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड जि. कोल्हापूर) मोबाईल नंबर - 9423270222

सहकार्य :- सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील (सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी), तानाजी वाघमारे (उपाध्यक्ष- शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी), भरत दत्तात्रय पाटील (सेवानिवृत्त डीएफओ- कोल्हापूर)

No comments:

Post a Comment